प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं काल रात्री निधन झालं. आज सकाळी शरद पवार, सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे यांनी रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जुन्या आठवणींना सुप्रिया सुळे यांनी उजाळा दिला. रतन टाटा यांच्या जाण्यानं मोठी हानी झाली आहे. माझे सासरे यांचेही टाटा यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. अनेक आठवणी त्यांच्यासोबतच्या आहेत. मी विमानात त्यांच्याबरोबर प्रवास केला आहे. मला त्यांचा साधेपणा कायम जाणवला आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जेव्हा भारतात आले होते. तेव्हा मला रतन टाटा यांच्यासोबत तीन तास वेळ घालवण्याची संधी मिळाली. ओबामा यांच्यासोबत स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं. तेव्हा जेवताना रतन टाटा यांच्या शेजारी माझी बसण्याची व्यवस्था होती. तेव्हा त्यांच्याशी माझी विविद मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांच्यासोबत हा वेळ घालवता आला. हे माझं भाग्य आहे, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
दोन तीन वेळा मी आणि रतन टाटा यांनी एकत्र प्रवास केला आहे. युनायटेड नेशन्सच्या कार्यक्रमासाठी मी केंद्र सरकारच्या वतीने गेले होते. तेव्हा योगायोगाने त्याच विमानात रतन टाटा देखील होते. पण असं वाटलंही नाही की रतन टाटा आपल्यासोबत प्रवास करत होते. प्रचंड साधेपणा या माणसात होता. माझं भाग्य की मला काही काळ त्यांच्यासोबत घालवता आला, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
माझ्या वडिलांचे रतन टाटा यांचे जवळचे संबंध होते. त्याहून जास्त माझे सासरे आणि रतन टाटा यांचा स्नेह होता. त्यांचे कौटुंबिक संबंध होते. अनेक वर्षे रतन टाटा आणि माझ्या सासरे भालचंद्र सुळे यांचे जवळचे संबंध राहिले. त्यांनी अनेक संस्थांवर एकत्र काम केलं आहे. माझं माहेर आणि सासर दोन्हीकडून रतन टाटा यांच्यासोबत जवळचे संबंध होते, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.