अजय सोनवणे, TV9 मराठी, मुंबई : जाहीर भाषणातल्या नक्कलीमुळे ठाकरे गटाच्या 3 नेत्यांवर गुन्हे दाखल (Crimes filed against the leaders) झाले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांवर. (Bhaskar Jadhav) पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याप्रकरणी नेत्या सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare), आणि नाव न घेता राणेंवर विखारी टीका केल्याप्रकरणी खासदार विनायक राऊतांवर गुन्हा दाखल झालाय. या तिन्ही नेत्यांसहीत मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम 153, कलम 500 अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यांनी महाप्रबोधन यात्रेत भाषणं केली होती.त्या सभेत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ठाण्याच्या नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भाषणांमध्ये नेत्यांच्या नक्कला करण्याचा प्रकार नवीन नाही. मात्र त्यावर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण अलीकडे सुरु झालंय. याआधी राज ठाकरेंनी अनेकदा पंतप्रधान मोदींची नक्कल केली होती. तेव्हा गुन्हे का दाखल झाले नाहीत, असा प्रश्न सुषमा अंधारेंनी केलाय.
सुषमा अंधारेंच्या भाषणाआधी भास्कर जाधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाची नक्कल केली, आणि त्यानंतर ज्याप्रकारे भाजप नेते गिरीश महाजनांनी पेपरचा आडोशा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उत्तरं सांगण्याचा प्रयत्न केला, त्याचीही भास्कर जाधवांनी नक्कल केली.
भास्कर जाधवांनी याआधी सभागृहात आणि त्यानंतर यंदा झालेल्या दसरा मेळाव्यातही नारायण राणेंची नक्कल केली होती. त्याआधी सभागृहात जाधवांनी मोदींची केलेली नक्कलही वादात आली. तेव्हा भाजप नेत्यांनी ते शब्द मागे घेण्याची मागणी लावून सभागृह बंद पाडलं होतं.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे वगळता सुषमा अंधारे आणि भास्कर जाधवांच्या टार्गेटवर नारायण राण होते.मात्र आता महाप्रबोधन यात्रेत खासदार विनायक राऊतांनी राणेंवर केलेली टीकाही वादात आलीय.