अभिजीत पोते, पुणे : सत्ताधाऱ्यांचा विधानसभेच्या पायरीवर गोंधळ म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे, असे एका वाक्यात वर्णन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केले आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. विधानसभा परिसरात महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करीत असताना सत्ताधाऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार सकाळी घडला. शिंदे गटाचे आमदार यावेळी आक्रमक झाले होते. 50 खोके एकदम ओक्के अशाप्रकारची घोषणाबाजी विरोधकांकडून करण्यात येत होती. अधिवेशन (Assembly) सुरू झाल्यापासून ही घोषणाबाजी केली जात आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांत प्रतिक्रिया देत धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. शिंदे गटासह भाजपावर (BJP) त्यांनी यावेळी टीका केली.
तुमच्या गटातील आमदारांना 50 खोक्यांची ऑफर दिली हे सत्य आहे. तुमच्या अनेक ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाल्या आहेत. तुम्हाला या सगळ्यांना उत्तर द्यायचे होते तर त्याचदिवशी का नाही दिले, असा सवाल सुषमा अंधारे यांनी धक्काबुक्की करणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांना केला आहे
भाजपाची आंदोलने ही इव्हेंट असतात. भाजपा असे अनेक पॉलिटिकल इव्हेंट अधूनमधून करत असते, तेच आज विधानसभेत पाहायला मिळत आहे. त्यांच्या स्मृती इराणी असे इव्हेंट करतात, तर मीडिया डिबेट पॅनेलमध्ये संबित पात्रा असे इव्हेंट करतात. आत्ता जे काही चालले आहे, तो देखील एक इव्हेंटच आहे.
ज्या लोकांना मातोश्रीने राजाश्रय दिला, ज्यांना साधे राजकीय गोष्टीचे आकलनही नव्हते, असे असताना तुम्हाला मोठे केले, अशा माणसांना आमदारकीपर्यंत आणि मंत्रीपदांपर्यंत याच मातोश्रीने पोहोचविला, असे अंधारे म्हणाल्या. ज्या कृषीमंत्र्याला हेक्टरमध्ये किती एकर असतात, हे माहीत नाही, अशांना मातोश्रीने मोठे केले, अशी टीका त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केली. मातोश्रीवर बोलताना किमान आपली विवेकबुद्धी जागी ठेवली पाहिजे, असे म्हणत या लोकांनी लक्षात घ्यावे, की सूर्याकडे तोंड करून थुंकायला गेले तर थुंकी आपल्याच अंगावर पडते, अशी टीका त्यांनी केली.