कृष्णा सोनरवाडकर, मुंबई : राज्याची राजधानी आणि अत्यंत संवेदनशील असलेल्या मुंबईतून (Mumbai) मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईनजीकच्या समुद्र किनाऱ्यावर (Seashore) काही अंतरावर एक संशयास्पद बोट आढळली आहे. आज सकाळीच नौदलाला पालघरच्या समुद्र किनाऱ्यावर ही संशयास्पद हालचाल दिसून आली. नौदलाने या संशयास्पद बोटीची माहिती तत्काळ मुंबई पोलिसांना दिली. ही बोट पाकिस्तानातन आली असून त्यावर दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची शंकाही व्यक्त केली जातेय. मात्र या माहितीला पोलीस सूत्रांनी किंवा नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाहीये. सध्या तरी या बोटीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मुंबईजवळील पालघरच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट आढळल्याचं नौदलाच्या अधिकाऱ्यांना दिसून आलं. त्यानंतर मुंबई पोलिसांना सदर घटनेबाबत सूचित करण्यात आलंय. पालघरच्या समुद्रात ४२ नॉकिटल आत ही संशयास्पद हालचाल दिसून आली. मात्र अद्याप या बोटीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. या बोटीवर काही पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशयदेखील व्यक्त केला जातोय.
मुंबईत झालेल्या 26-11 च्या हल्ल्यानंतर पोलिसांनी धसकाच घेतला आहे. या हल्ल्यातील दहशतवादीदेखील समुद्री मार्गाने आले होते. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेबाबत पोलीस विभाग तसेच नौदलाकडून मोठी खबरदारी घेतली जाते. कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास तत्काळ सर्व यंत्रणांना अलर्ट पाठवला जातो. आज पालघरच्या समुद्र किनाऱ्याजवळील या संशयास्पद बोटीनेही मुंबई पोलिसांची झोप उडाली आहे.
मुंबईत आज सकाळीच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पंजाबमधील गँगस्टार लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती हाती आली आहे. धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याने लॉरेन्स बिश्नोई याचं नाव संदेशात लिहिलं आहे. हा मेसेज नेमका कुणी पाठवला, यावरून पोलिसांचा तपास सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातून एका 23वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या तरुणाकडून लवकरच सदर प्रकरणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.