मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यानंतर आता मुंबईतील मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा बसू लागला आहे. मंत्रालयाच्या महसूल विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील प्रवेश पासवर निर्बंध आणा, अशी मागणी महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेने केली आहे. या संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहित ही मागणी केली आहे. (Take Restrictions on Mumbai Mantralaya Visitor Pass)
कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असल्यानं मंत्रालयातील पासवर निर्बंध आणावे. तसेच मंत्रालय प्रवेश पास तुर्तास न देण्याची मागणी केली आहे. मंत्रालयातील वेगवेगळ्या विभागात कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मंत्रालयाच्या गेटवर तापमानाची नोंद, सॅनिटाझयर व्यवस्था करण्याचीही मागणी केली आहे.
महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेचे पत्र
“राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील रुग्णसंख्येतही दरदिवशी दुप्पटीने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात अनेक सार्वजनिक बाबींवर प्रतिबंद आणण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शासनाने घालून दिलेले कोरोनाचे निर्बंध तंतोतंत पाळले जातात किंवा कसे अथवा पाळले जात नसल्यास, सक्तीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात यातील एकाही बाबीचे पालन होताना दिसत नाही.”
“राज्यभरातील विविध भागातून येणाऱ्या अभ्यागतांना मंत्रालयात मुक्त प्रवेश आहे. अगदी कोरोना संक्रमित भागातील अभ्यागतांसाठी सुद्धा काहीही निर्बंध नाहीत. येणाऱ्या अभ्यागतांचे शरीराचे तापमान नोंदणे ते मास्कचा वापर करतात किंवा कसे, याबद्दल कोणतीही यंत्रणा न ठेवणे, अभ्यागतांचे हाताचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी कोणतीही यंत्रणा/ व्यवस्था अस्तित्वात नसणे यासारख्या बाबींमुळे मंत्रालयात कोरोनाचा धोका वाढला आहे. पण मंत्रालयाच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागांमध्ये सुद्धा कोरोनाच्या प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झाली आहे.”
“गेल्या दोन तीन दिवसांत मंत्र्यांसह मंत्रालयातील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने कोरोनाबाधित झाले आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका टळेपर्यंत निर्बंध आणावेत, अशी मागणी महाराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी सदस्यांच्या संघटनेने केली आहे. तसेच मंत्रालयात कोरोना प्रतिबंधात्मक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी विनंतीही केली आहे.”
मंत्रालयाला कोरोनाचा विळखा
मंत्रालयाच्या महसूल विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच विभागातील इतके कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेले व्यक्ती क्वारंटाईन झाले आहेत. तसेच महसूल विभागात सॅनिटायझेशनही करण्यात येण्याची शक्यता आहे.
मंत्रालयातील हे कर्मचारी कोण आहेत, त्यांचा गेल्या दोन दिवसात काही संपर्क आला का? याबाबत शंका उपस्थितीत केली जात आहे. मात्र मंत्रालयात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केल्याने धाकधूक वाढू लागली आहे. (Take Restrictions on Mumbai Mantralaya Visitor Pass)
संबंधित बातम्या :
लॉकडाऊनबाबत खोटी माहिती पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, गृहमंत्र्यांचा इशारा