‘वज्रमूठ’ सभूपूर्वीच ठाकरे गटाला खिंडार, पक्षाची खडा न् खडा माहिती असलेला मोहरा शिंदे गटात; कोणत्या नेत्याने केला पक्षप्रवेश?

| Updated on: May 01, 2023 | 7:37 AM

उद्धव ठाकरे यांनी एकीकडे पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू केलेले असतानाच दुसरीकडे ठाकरे गटाला लागलेली गळती अद्यापही थांबताना दिसत नाही. ही गळती सुरूच आहे.

वज्रमूठ सभूपूर्वीच ठाकरे गटाला खिंडार, पक्षाची खडा न् खडा माहिती असलेला मोहरा शिंदे गटात; कोणत्या नेत्याने केला पक्षप्रवेश?
maruti salunkhe
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : एकीककडे वज्रमूठ सभा आणि प्रबोधन यात्रेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाने पक्षबांधणी जोरात सुरू केली आहे. ज्या आमदारांनी पक्ष सोडला त्यांच्याच मतदारसंघावर ठाकरे गटाने पक्ष बांधणीवर जोर दिला आहे. मात्र, एकीककडे ठाकरे गटाचे हे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे ठाकरे गटाची लागलेली गळती काही थांबताना दिसत नाही. ठाकरे गटाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांचे निकटवर्तीय, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संघटना आणि प्रशासकीय कामाची इत्यंभूत माहिती असलेले माहीतगार मारुती साळुंखे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. मुख्यमंत्र्यांनी हातात भगवा झेंडा देत साळुंखे यांचे पक्षात स्वागत केले. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

TV9 Marathi Live | Maharashtra Politics | Maharashtra Din 2023 | Bazar Samiti Election Result

महाविकास आघाडीची आज बीकेसी मैदानावर रॅली आहे. या वज्रमूठ सभे आधीच शिंदे गटाने ठाकरे गटाचा मोहरा आपल्या गळाला लावला आहे. मारुती साळुंखे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव आणि खासदार अनिल देसाई यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. गटातील आणि संघटनेची घडी कशी बसवावी तसेच प्रत्येकाशी संपर्क ठेवून संघटना तळागाळात कशी पोहचवावी याची जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर होती. तेच आता शिंदे गटात आल्याने शिंदे गटाला मोठं बळ मिळालं आहे.

हे सुद्धा वाचा

जबाबदाऱ्या दिल्या पण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध उठाव करून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र चूल मांडली आहे. त्यानंतर ठाकरे गटाने संघटनेची नव्याने बांधणी करण्यासाठी मारुती साळुंखे यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी सलगी करून घेतलेली भूमिका त्यांना पटेनाशी झाली होती. तसेच बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जायचे असेल तर एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखालील शिवसेनेत जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही हे पटल्यानेच त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

संघटना वाढवणार

साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाची नव्याने बांधणी करण्याच्या कामाला बळ मिळणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेली संघटना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सोबत मिळून संघटना अधिक जोमाने वाढवू असेही सांगितले.

मारुती साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून संघटनेची अचूक बांधणी करणारा एक मोहरा शिंदे यांना मिळल्याने पक्षवाढीसाठी त्याचा त्यांना मोठा उपयोग होणार आहे. या पक्षप्रवेशावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे हेदेखील उपस्थित होते.