मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे लॉकडाऊन (Lockdown) हा अटळ मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजवटीची तुलना ब्रिटिशांच्या काळातील रँडच्या राजवटीशी केली आहे. 1897 साली प्लेगची साथ आली त्यावेळी रँडने लोकांवर कशाप्रकारचे अत्याचार केले याचा अनुभव राज्यातील जनता सध्याच्या काळात घेत आहे, असे ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. (MNS leader Sandeep Deshpande take a dig at CM Uddhav Thackeray)
त्यामुळे आता शिवसेना मनसेच्या या आरोपांना काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल. मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हला प्रत्युत्तर म्हणून संदीप देशपांडे हेदेखील आज फेसबुक लाईव्ह करणार आहेत. या फेसबुक लाईव्हमध्ये ते काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आतापर्यंत भाजपने लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे आता मनसेही भाजपच्या सुरात सूर मिसळणार का, हे पाहावे लागेल.
१८९७ साली प्लेगची साथ आली त्यावेळी रँड ने लोकांवर कशाप्रकारचे अत्याचार केले याचा अनुभव राज्यातील जनता सध्याच्या काळात घेत आहेत.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 4, 2021
राज्यातील कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे आता लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) जवळपास निश्चित मानला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधताना तसे संकेतही दिले होते. हा इशारा आणखी कोणी गंभीरपणे घेतला की माहिती नाही पण मद्यप्रेमींनी मात्र काळाची पावले ओळखून ‘स्टॉक’ची जमवाजमव सुरु केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिवसभरात व्यावसायिक, उद्योजक, पत्रकार आणि इतर तज्ज्ञांच्या भेटीगाठी घेतल्या. या सगळ्यानंतर लॉकडाऊनची छाया आणखी गडद झाली होती. त्यामुळे शनिवारी रात्री नालासोपाऱ्यात ‘वाईन शॉप’बाहेर मोठी गर्दी होताना दिसली. आगामी काही दिवसांत मद्याची रसद कमी पडायला नको म्हणून मद्यप्रेमींनी वाईन शॉपबाहर रांगा लावल्या होत्या. नालासोपारा पूर्व येथील नगीनदास पाडा परिसरातील हे दृश्य अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.
राज्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय. राज्यात आज दिवसभरात तब्बल 49 हजारांपेक्षाही जास्त रुग्ण आढळले. कोरोनाबाधितांचा हा आकडा लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (2 एप्रिल) लॉकडाऊनचा इशारा दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांसोबत बैठका घेतल्या. यामध्ये चित्रपट, नाट्य क्षेत्रासह मल्टिप्लेक्स-चित्रपटगृह चालकांचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनबाबत चर्चा केली. या चर्चेत सर्वांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला.
(MNS leader Sandeep Deshpande take a dig at CM Uddhav Thackeray)