मुंबई | 16 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडून सादर झालेल्या घटनेच्या आधारे आपला निर्णय दिला. निवडणूक आयोगाकडे 1999 ची घटना आहे. त्याचा आधार घेऊन निर्णय दिला असे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले होते. मात्र, जनता न्यायालयात शिवसेना नेते अनिल परब यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिंदे गटाचे सर्व दावे फोल ठरवले. नेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भर स्टेजवर उद्धव ठाकरे यांच्या पाया पडले. त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना गुच्छ देऊन स्वागत केले. अनिल परब यांनी हा व्हिडीओ दाखवत शिंदे गटाला चांगली चपराक लगावली.
2018 च्या कार्यकारिणीच्या प्रतिनिधी सभेमध्ये झालेले ठराव आणि त्याची सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली होती. अध्यक्ष यांनाही दिली होती. तरीही म्हणतात आमच्याकडे तुमचे पुरावे आले नाहीत. यावर अनिल परब यांनी 2018 च्या कार्यकारिणी सभेत काय घडलं? याची सर्विस्तर माहिती दिली.
2018 च्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून फेर निवड झाली. या बैठकीत आदित्य ठाकरे यांची नेते पदी बिनविरोध निवड झाली त्यांच्यासोबत ९ नेते आणि २१ उपनेने यांची निवड झाली. या सर्व प्रस्तावाची पोच देण्यात आली होती असे अनिल परब म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड केली होती. त्या प्रतिनिधी सभेत जाहीर केलं होतं. ही सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिले होते. राष्ट्रीय कार्यकारिणी १३ सदस्यांची होती. त्याच बैठकीत चंद्रकांत खैरे, अनंत गिते, आनंदराव अडसूळ यांचीही नेतेपदी निवड करण्यात आली होती. नेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भर स्टेजवर उद्धव ठाकरे यांच्या पाया पडले. त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना गुच्छ देऊन स्वागत केले याचा व्हिडीओ अनिल परब यांनी यावेळी दाखविला.
निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर एक कागद टाकला आहे. त्यात पक्षाचं नाव, पक्षप्रमुख कोण आहे, पुढची निवडणूक कधी आहे, याची माहिती दिली आहे. हा अधिकृत कागद आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांना बोलावलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे यांचं नाव आहे. त्यांना बोलावलं जातं. पक्षाध्यक्ष म्हणतात तरीही म्हणतात तुमचे कागदपत्र नाही. आम्ही पुरावे दिल्याशिवाय तुम्ही बदल केले का? असा सवाल अनिल परब यांनी यावेळी केला.