10 कोटींचे 4 फ्लॅट खरेदी केले? आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण सात तासांपासून ईडी कार्यालयात

| Updated on: Jun 26, 2023 | 7:58 PM

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांची गेल्या सात तासांपासून ईडी चौकशी सुरु आहे. ते आज दुपारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. त्यानंतरपासून ते तिथेच आहेत. ईडी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात चव्हाण यांच्या घरी छापा टाकला होता. ईडी अधिकारी तब्बल 17 तास चव्हाण यांच्या घरी तपासासाठी ठाण मांडून होते.

10 कोटींचे 4 फ्लॅट खरेदी केले? आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण सात तासांपासून ईडी कार्यालयात
Follow us on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाला अडचणीत आणणाऱ्या घडामोडी सध्या मुंबईत सुरु आहेत. नुकतंच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजप आक्रमक झालीय. भाजप नेत्यांनी कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी, असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून जोरदार कारवाई सुरु आहे. ईडी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तपास करताना एकाच दिवशी मुंबईत तब्बल 14 पेक्षा जास्त ठिकाणी छापा टाकलेला. विशेष म्हणजे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांच्या घरी ईडीने तब्बल 17 तास झाडाझडती घेतली होती. त्यानंतर त्यांची आज गेल्या सात तासांपासून चौकशी सुरु आहे.

मुंबई महापालिकेतील कथित कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी सुरज चव्हाण यांची चौकशी सुरु आहे. सुरज चव्हाण यांनी 10 कोटी किंमतीचे 4 फ्लॅट खरेदी केल्याचं तपासात समोर आलं आहे. तसेच चव्हाण यांचा कॉन्ट्रॅक्ट डिलिंगमध्ये सहभाग होता, असा ईडीला संशय आहे. सुरज चव्हाण हे आज दुपारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. गेल्या साडेसात तासांपासून त्यांची चौकशी सुरु आहे. ईडीचे वरिष्ठ अधिकारी ईडी कार्यालयात आहेत. ईडी कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमू नये यासाठी पोलिसांकडूनही काळजी घेतली जात आहे. ईडी कार्यालयाबाहेर सकाळपासून मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

ईडीला नेमका संशय काय?

कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात सुरज चव्हाण यांनी मध्यस्थी म्हणून भूमिका साकारली होती, असा ईडीला संशय आहे. तसेच सुरज चव्हाण यांनी कोरोना काळानंतर 10 कोटी रुपयांचे 4 फ्लॅट घेतलेचा संशय आहे. त्याचे कागदपत्रेही ईडीच्या हाती लागले आहेत. त्याच अनुषंगाने सुरज चव्हाण यांना आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी येण्याचं समन्स बजावण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

सुरज चव्हाण यांना आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स होतं. पण ते दुपारी साडेबारा वाजता ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर गेल्या सात तासांपासून त्यांची चौकशी सुरु आहे.

सुरज चव्हाण यांची आज चौकशी झाल्यानंतर मुंबई महापालिकेतील आणखी काही अधिकाऱ्यांना ईडीकडून समन्स देवून चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये महत्त्वाचं नाव म्हणजे मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल. संजीव जयस्वाल यांच्या घरी छापेमारी झाली होती. या छापेमारीत त्यांच्या घरी 100 कोटींच्या स्थावर मालमत्तेचे कागदपत्रे तसेच 15 कोटींची एफडी मिळाली. याप्रकरणी जयस्वाल यांची चौकशी होऊ शकते.