मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा धुरळा आता खाली बसू लागला आहे. तर, महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढाई महाराष्ट्रात यावेळी होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) शिवसेनेकडून चार लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये या जागांबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती ठाकरे गटाच्या नेत्याने दिली.
दिवाळीनंतर राजकीय पक्षांनी लोकसभेच्या जागांवर दावा करायला सुरुवात केली आहे. परंतु, ठाकरे गटाने लोकसभेच्या चार जागांवर उमेदवारही ठरवले आहेत अशी चर्चा सुरु आहे. रायगड लोकसभेसाठी अनंत गिते, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तीकर आणि ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांची नावे ठाकरे गटाने निश्चित केली आहेत अशी माहिती मिळतेय. खासदार विनायक राऊत यांनीही या वृत्ताला दुजारा दिलाय.
महाविकास आघाडीचे जागावाटपाची बोलणी पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर पडली. मात्र, ठाकरे गटाने चार लोकसभा जागांबाबत ठाकरे गटाने निर्णय घेतला आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून माजी खासदार संजय दिना पाटील यांचे नाव चर्चेत आहे. ईशान्य मुंबईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. मात्र, माजी खासदार संजय दिना पाटील यांनी ही जागा लढावी अशी समस्त भांडुपकर आणि आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही सामोपचाराने आणि विनंती करून ही जागा आमच्याकडे घेऊ असे खासदार विनायक राऊत म्हणाले.
उत्तर पश्चिम मतदारसंघातून गजानन कीर्तीकर यांनी गेल्यावेळी निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांनी शिंदे गटाची वाट धरली. ही जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे येथे अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्याची आमची तयारी आहे. तसेच, दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचा पुन्हा संधी देण्यात येईल, रायगडमधून अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्याविरोधात अनंत गिते हे आमचे उमेदवार असतील, असेही त्यांनी सांगितले.
जे बाडगे झाले त्यांना आधार देण्याचे काम भाजपाकडून चालू आहे. पूर्वी देखील ज्यांना ईडीच्या नोटीसा दिल्या गेल्या त्यांनी शरणागती भाजपची पत्करली. त्यांच्यावरचे सर्व आरोप बाजूला ठेवायचे आणि त्यांना धुतल्या तांदळासारखे पुढे आणायचे हा भाजपचा डाव आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली. पंतप्रधान सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहे त्याबद्दल टीका करण्याची गरज नाही. पंतप्रधान सिंधुदुर्गला नक्की काय घेऊन येणार आहेत हे महत्त्वाचं आहे. माझ्यासमोर कोण उमेदवार येतोय याचे गणित मांडून कामाला लागलो आहे असा टोलाही त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला.