मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काय शक्य नाही? असा विषयच होऊ शकत नाही. शिवसेना काही महिन्यांपूर्वी दोन विभागात विभागली गेलीय. एक ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट. शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव मंजूर केल्याने त्यांच्या गटाला अधिकृतपणे शिवसेना म्हटलं जातंय. पण तरीही दोन्ही गटातला संघर्ष जसाचा तसाच आहे. आधी दोन्ही गट एकत्र येतील, अशी आशा अनेकांकडून व्यक्त केली जात होती. पण ते शक्य झालं नाही. विशेष म्हणजे शिवसेना पक्षाचा वाद अगदी घरापर्यंत पोहोचलेला बघायला मिळालाय.
खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटाला साथ दिलीय. तर त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर ठाकरे गटासोबत आहेत. विशेष म्हणजे पक्षांतर्गत असलेला हाच संघर्ष आता कुठपर्यंत जातो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट शिंदे गटाच्या उमेदवारांच्या पराभवासाठी अनोखी शक्कल लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या शक्कलमुळे कदाचित कीर्तिकर पिता-पुत्र एकमेकांविरोधात निवडणूक लढवू शकतात.
सुप्रीम कोर्टाचा निकाल समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. आगामी काळात राज्यातील मोठ्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. तर पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटात तर प्रचंड घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. अमोल कीर्तिकर लढले नाहीत तर सुनील प्रभू यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना नेते गजानन कीर्तिकर हे गेल्या अनेक वर्षांपासून खासदार आहेत. पण ते आता शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर आणि सुनील प्रभू यांचं नाव चर्चेत आहे. त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. मुंबईत जे खासदार ठाकरे गटाला सोडून गेले आहेत त्यांच्याविरोधात ही रणनीती आखली जात आहे. ठाकरे गटाने भविष्यात आपला उमेदवार कोण असावा? याची देखील चाचपणी सुरु केल्याची माहिती मिळत आहे.