ठाणे : ठाण्यातील 19 वर्षीय तरुणाने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचा प्रकार समोर आला आहे. वॉचमन म्हणून काम करणाऱ्या 45 वर्षीय काकाची पुतण्याने हत्या केली. हत्येनंतर डोकं धडावेगळं करुन बॅगेत भरुन निर्जनस्थळी फेकून दिलं. काकाने जादूटोणा करुन वडिलांचा जीव घेतल्याच्या समजुतीतून तरुणाने हत्या (Thane Man beheads Uncle) केल्याचा आरोप आहे.
45 वर्षीय विष्णू नागरे 14 नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने 15 तारखेला पोलिसांकडे केली होती. या प्रकरणी शीळ डायघर पोलिसांनी तपास करुन त्यांचा 19 वर्षीय पुतण्या अमित नागरे आणि त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे.
आरोपी अमित नागरे याच्या वडिलांचा 2016 मध्ये दारु प्यायल्यानंतर मृत्यू झाला होता. काकाने जादूटोणा करुन वडिलांचा जीव घेतला, अशी अमितची धारणा होती. या अंधश्रद्धेतूनच त्याने काकांचा काटा काढायचा प्लॅन आखला होता.
एकतर्फी प्रेमातून नववीच्या विद्यार्थीनीची हत्या, मुंबईपासून 118 किमीवर मृतदेह नेऊन जाळला
अमितने पार्टीच्या बहाण्याने काका विष्णू नागरे यांना दारु पाजली. ते मद्याच्या अंमलाखाली असताना अमितने चौघा मित्रांच्या मदतीने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. कोयता आणि तलवारीसारख्या धारदार शस्त्राने आरोपींनी त्यांचा गळा चिरला. हत्येनंतर विष्णू नागरे यांचं मुंडकं अमितने धडावेगळं केलं. ते बॅगेत भरुन तो बाईकने एका निर्जनस्थळी गेला आणि तिथेच ती बॅग त्याने टाकली.
एकूण पाच आरोपींना शीळ डायघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ठाण्याचे पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती (Thane Man beheads Uncle) दिली.
पालघरमध्ये विद्यार्थिनीची हत्या
एकतर्फी प्रेमातून नववीच्या विद्यार्थीनीची हत्या करुन मुंबईपासून 118 किमीवर नेऊन तिचा मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. पालघरमधील तलासरीत 15 वर्षीय मुलीचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. ऑक्टोबरमध्ये विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबाने समता नगर पोलिस ठाण्यात दिली होती. ती पोयसरमधील जनिया कम्पाऊंड येथून बेपत्ता झाली होती. त्यानंतर 3 ऑक्टोबरला मुलीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत मिळाला. आता पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.