ठाण्यातील नौपाडा परिसरात एका भरधाव आलीशान मर्सिडीज कारने धडक दिल्याने मोटारसायकलीवरुन जाणारा एका तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री उशीरा घडली होती. या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषीत करण्यात आले होते. या प्रकरणातील कार चालक घटनास्थळावर वैद्यकीय मदतीसाठी न थांबता पसार झाला होता. या प्रकरणात अखेर हा कार चालक नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे.
ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नितीन जंक्शन येथे नाशिक हायवेने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव कार चालकाने दुचाकी चालकाला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्री 1.50 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दर्शन हेगडे ( 21 रा.वागळे इस्टेट ) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मर्सिडीज कारचा चालक घटना स्थळी न थांबता पळून गेला होता, त्यामुळे खळबळ उडाली होती.
या प्रकरणातील टीव्हीएस मोटार सायकल पेशाने टॅक्स कन्सलटन्ट असलेल्या फिर्यादी दीशीत ठक्कर यांची आहे. ही मोटरसायकल त्यांच्याकडे कामाला असलेल्या शशांक हेगडे वापरत होते. त्यांचा लहान भाऊ दर्शन चायनीझ आणण्यासाठी वागळे इस्टेट येथे गेला होता. त्यानंतर तो घरी जात असताना हा अपघात घडला. नितीन जंक्शन येथे नाशिक हायवेने मुंबईकडे येणाऱ्या मर्सिडीज कार ( MH 02 BK 1200 ) चालक अभिजित नायर याच्या कारचे नियंत्रण चुकल्याने त्याने दर्शन हेगडे यांच्या टीव्हीएस मोटरसायकलला धडक दिली. त्यात दर्शन हेगडे याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळावरुन पसार झालेल्या आरोपी अभिजीत नायर याने अखेर ठाणे पोलिस आयुक्तालयात जाऊन सरेंडर केले आहे.