मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी ठाण्यातील नगरसेवकांची बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या दालनात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे हे उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना आनंद परांजपे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याच्या भावना ठाण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केल्या. आम्ही शरद पवार यांच्या विचारांवर पक्के असल्याचं सांगितलं. पण,गेल्या दोन-तीन महिन्यापासून पोलीस आणि प्रशासनाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी केला.
राज्य सरकारकडून दडपशाहीचा वापर केला जातो. कधीकधी पैशांचं प्रलोभन दाखविलं जातं. यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना टार्गेट केल्याचं काम केलं जात असल्याचा आरोपही आनंद परांजपे यांना केला.
ऐन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एखादा खोटा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुकीच्या काळात जेलमध्ये टाकण्याचं काम हे घटनाबाह्य सरकार करू शकते, अशी भीती नगरसेवकांनी व्यक्त केल्याचं आनंद परांजपे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता खंबीर आहेत. नगरसेवकांनी आपल्या मनातील शंका अजित पवार यांच्यासमोर आज मांडल्या. ९ मार्च २०२२ ला नगरपालिकेची मुदत संपली. याला सुमारे एक वर्ष होत आलंय.
मागच्या वेळचा निधी कापण्यात आला. प्रशासक बसल्यानंतर घटनाबाह्य सरकारबरोबर असाल तर निधी दिला जातो. ही व्यथाही नगरसेवकांनी व्यक्त केल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं.
मला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन तयार करण्यात आल्याचा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला.