ठाणे : ठाण्यात एका आत्महत्या करणाऱ्या महिलेचा जीव पोलिसाने वाचवला आहे. पोलीस नाईक गजेंद्र सोनटक्के असे या जीव वाचवणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गजेंद्र सोनटक्के यांनी थेट उपवन तलावात उडी मारत महिलेचा जीव वाचवला. (Thane police save woman from Drowning)
शुक्रवारी (18 सप्टेंबर) रात्री साधारण 7 च्या सुमारास ठाण्यातील उपवन परिसरात गजेंद्र सोनटक्के आणि पोलीस नाईक संतोष मोरे हे दोघे पेट्रोलिंग करत होते. त्याच वेळी दोन तरुणी त्यांच्या जवळ धावत आल्या. त्यांनी सोनटक्के यांना थांबवत, एक महिला उपवन तलावात आत्महत्या करते, तुम्ही लवकर चला, असे सांगितले.
यानंतर सोनटक्के यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्या महिलेने उपवन तलावात आधीच उडी मारली होती. या महिलेला पोहता येत नसल्याने ती बुडू लागली. हे सर्व लांबून पाहत असलेले सोनटक्के यांनी धावत जात थेट तलावात उडी मारली.
त्यानंतर त्यांनी त्या महिलेचा जीव वाचविण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र गजेंद्र सोनटक्के यांनाही त्या महिलेने पकडून ठेवल्याने त्यांचाही जीव धोक्यात आला. अखेर स्वत: च्या जीवाची बाजी लावत त्या महिलेचे प्राण वाचवण्यात सोनटक्के यांना यश आले. तसेच तेही यातून सुखरुप बाहेर आले.
हा सर्व प्रकार घटनास्थळी असलेल्या ठाणेकरांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. गजेंद्र सोनटक्के हे महिलेचा प्राण वाचवून बाहेर येताच उपस्थितीत ठाणेकरांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
खरंतर कोव्हिड काळात खाकी वर्दीवाले कोरोना योद्धा आपले रक्षण करत आहेत. त्यात आता गजेंद्र सोनटक्के यांनी पुन्हा एकदा खाकीतल्या देवाचे दर्शन दिलं आहे. त्यामुळे खाकी वर्दीवरील विश्वास आणखी घट्ट झाल्याचे बोललं जात आहे. (Thane police save woman from Drowning)
संबंधित बातम्या :
ठाण्यात महापौर बंगल्याशेजारच्या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर, मनसेकडून पर्दाफाश