अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महारांजाचा प्रत्येक किल्ला हा आपल्याला प्रेरणा देतो. आपलं आयुष्य खूप कठीण आहे. आयुष्यात खूप संघर्ष आहे. पण हे संघर्षमय आयुष्य जगताना शिवरायांचे विचार, त्यांची प्रत्येक मोहीम, त्यांचं धाडसं, त्यांच्या अडचणी, संकटं आणि त्यांनी जिंकून मिळवलेले किल्ले हे जगण्याची नवी उमेद देतात. या किल्ल्यांसाठी शिवरायांच्या शेकडो मावळ्यांनी एकेकाळी प्राणाची आहुती दिली आहे. स्वराज्य उभं राहवं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातलं लहान मुल, महिला, शेतकरी, कष्टकरी सुखरुप राहावेत यासाठी ही झुंज होती. शिवराय इतके संवेदनशील होते की, मोहिमेसाठी निघालेल्या लष्कराला शेतकऱ्यांच्या पिकांमधून आपले घोडे चालवत नेवू नका, असा आदेश द्यायचे. पण त्यांनी निर्माण केलेल्या या स्वराज्यात काही गोष्टी अनपेक्षित घडत आहेत. लोकं आता याच शिवरायांच्या किल्ल्यांच्या इतिहासाला विसरत चालले आहेत का? शिवरायांचे विचार आणि संवदेशनशील स्वभावाला विसरत आहेत का? असा प्रश्न आता पडतो.
विशाळगडावर झालेल्या वादाआधी या किल्ल्याच्या इतिहासाची माहिती घ्या. विशाळगड किल्ला कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील गजापूर या पर्वतश्रेणीत वसला आहे. या किल्ल्याची बांधणी कधी झाली याबाबत नेमकी नोंद नाही. हा किल्ला शिलाहार राजा मारसिंह याने 1058 मध्ये बांधल्याची इतिहासात नोंद असून तेव्हा या किल्ल्याला खिलगिस असं नाव दिलं गेलं होतं. त्यानंतर जशी आक्रमण झालीत आणि ज्यांनी किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्यांनी नवीन नावे दिलीत. जसे की 1209 मध्ये देवगिरीचा तत्कालीन राजा सिउन यादवने शिलाहारच्या राजाचा पराभव करत किल्ला जिंकला. 1309 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी याने यादवांचा पराभव करत किल्ला जिंकला, 1347 ला पश्चिम भारताचा मुघल सरदार हसन गंगू बहामनी याने आपल्या सल्तनतीमध्ये किल्ला दाखल करून घेतला. त्यानंतर 1354 आणि 1433 विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली गेला. विजयनगर साम्राजाच्या पतनानंतर स्थानिक मराठा राजा शंकरराव मोरे यांनी आपल्याकडे घेतला. मात्र बहामनी सुलतानाने किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी प्रधान महमूद गवान याच्या नेतृत्त्वाखाली सैन्य पाठवत हा किल्ला मिळवला. यावेळी गनाचे अधिकारी कर्णसिंह भोसले आणि मुलगा भीमसिंहने घोरपडीचा वापर केल्याची नोंद इतिहासात आहे. त्यानंतर भीमसिंह यांना घोरपडे ही पदवी बहाल करण्यात आली.
1489 मध्ये युसूफ आदिल शाहने स्वत: च्या अधिपत्याखाली क्षेत्रासह बहामनी राज्यापासून स्वत: ला वेगळे केले आणि विजापूर येथे स्वतंत्र सुलतानाची स्थापना केली आणि हा किल्ला आदिलशाही सल्तनताला जोडला गेला. त्यानंतर 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर पन्हाळा ताब्यात घेतला. त्यासोबतच खेळणा, पावनगड आणि रांगणा हे किल्ले घेतले. यामधील खेळणा किल्ल्याला महाराजांनी विशाळगड असे नाव दिले. या गडाची इतिहासामध्ये आणखी एक नोंद म्हणजे पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून शिवाजी महाराज विशाळगडावर गेले होते. त्याावेळी महाराज सुखरूप किल्ल्यावर पोहोचेपर्यंत शत्रूला खिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी रोखून धरलं होतं. बाजीप्रभू धारातीर्थी पडले त्यामुळे खिंडीला पावनखिंड असे नाव देण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ल्यावर नवीन बांधकामे केली होती. याच विशाळगडावरून रायगडाकडे जात असताना 1689 मध्ये संगमेश्वर येथील तुळापूर येथे पकडले गेले होते.
ज्यावेळी रायगड किल्ला मराठ्यांच्या हातातून मोगलांच्या ताब्यात गेल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या तीन पत्नी अंबिकाबाई, राजसबाई आणि ताराबाई काही दिवस विशाळगडावर होत्या. जिंजीमध्ये सात वर्षे मोघलांनी वेढा दिला मात्र राजाराम महाराज सुखरूप सुटले आणि विशाळ गडावर आले. मोगल सेनापती झुल्फिकारखानाने मराठ्यांचा बरासचा भाग आणि त्यातील किल्ले आपल्या ताब्यात घेतले होते. यामध्ये विशालगडाचाही समावेश होता. मात्र राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर अंबिकाबाई या विशाळगडावर सती गेल्या होत्या. त्यानंतर महाराणी ताराबाई यांनी विशाळगड पुन्हा जिंकला आणि मुलगा शिवाजी यांचा राज्याभिषेक करून त्यांना गादीवर बसवले होते. त्याकाळात पन्हाळा आणि विशाळगड ही आलटून पालटून मराठ्यांची राजधानी होती. औरंगजेबाने पुन्हा 1702 मध्ये किल्ल्याला वेढा घातला मात्र परशुराम त्रिंबक यांनी दिलेल्या कडव्या प्रतिकारामुळे औरंगजेबाला काही अटी मान्य करून किल्ला ताब्यात मिळाला होता. मराठ्यांनी काही दिवसांनी पुन्हा तो किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला. करवीरकरांच्या ताब्यात गेलला विशाळगड हा प्रतिनिधींच्या ताब्यात होता. मात्र 1844 मध्ये, किल्लेदारांच्या विद्रोहाच्या परिणामी, ब्रिटिश सैन्याने संपूर्ण किल्ला पाडला आणि किल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं.
बाजीप्रभू देशपांडेंसह मावळ्यांनी जीवाची बाजी लावून पावनखिंड लढवली. त्याच पावनखिंडीपासून साधारण 23 किलोमीटर असलेला या विशाळगडावर शिवाजीराजे सुखरुप पोहोचले. शिवकाळात विशाळगड अत्यंत महत्वाचा होता. कोकण ते कोल्हापूरपर्यंतचा व्यापार ज्या मार्गानं व्हायचा. त्यासाठी विशाळगडाचा वापर टेहळणी म्हणून केला जायचा.
विशाळगड समोर अणुस्कुरा घाट, पुढे आंबा घाट, याच मार्गावरुन होणाऱ्या सर्व हालचालींवर विशाळगडावरुन बारीक लक्ष ठेवता यायचं. गूगल अर्थवरुन विशाळगडाचं चित्र सध्या पाहिले तर येथे दिसणारी सर्वच बांधकाम अनधिकृत नाहीत. इथलं मारुती मंदिर, अमृतेश्वर, भगवंतेश्वर, विठ्ठल-रुख्मिनी, गणेश, विठलाई, रामेश्वर, नरसोबा, वेताळ, वाघजाई, खोकलाई देवी आणि हजरत मलिक रेहान दर्गा आहे. हा दर्गाही इथं साधारण 17 व्या शतकापासून आहे. या सर्व वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहेत.
इथल्या मलिक रेहान दर्ग्यात मुस्लिमांसोबत हिंदूही नवस बोलतात. त्यासाठी बोकडंही कापली जातात. हळूहळू इथं येणाऱ्यांची संख्या वाढली., पर्यायानं किल्ल्यांवर पर्यटकांसाठी दुकानं, घरांचं अनधिकृत बांधकाम सुरु झालं. काही मंदिरांबाहेरही अशीच दुकानं उभी राहिली. घरं, पत्राचा शेड, दुकानं असं सर्व मिळून साधारण 156अनधिकृत बांधकामं इथं आहेत. यात मुस्लिमांसोबत काही हिंदूचाही समावेश आहे. माहितीनुसार इथली बहुतांश अनधिकृत बांधकामं ही साधारण 15 वर्षांपूर्वीची आहेत. विशाळगडावरील अतिक्रमणाचा वाद जुना आहे. पण, याठिकाणी असलेला दर्गा जुना असल्यानं ते अतिक्रमण नाही असं मुस्लीम संघटनांचं म्हणणं आहे. आता काल-परवा नेमकं घडलं काय. ते समजून घेऊयात.
अनेक वर्षांपासून विशाळगड अतिक्रमण मुक्त करा म्हणून आंदोलनं होत आहे. दीड वर्षांपूर्वी प्रशासनानं बैठक घेवून अतिक्रमण हटवण्याचा शब्द दिला होता. मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण हटलं नाही. 13 जुलैलाच पावनखिंडीतली लढाई झाल्यानं त्यादिवशी आधीपासून इथं मोठी संख्या जमली होती. त्यात अतिक्रमणाविरोधात 14 जुलैला संभाजीराजे विशाळगडाच्या दिशेनं निघाले. मात्र संभाजीराजे पोहोचण्याच्या दोन तासआधीच किल्ल्याच्या पायथ्याशी वाद आणि नंतर त्याचं पर्यावसान तोडफोडीत झालं.
विशाळगडाचा पायथा आहे तेथे आधी विशाळगडावर जाण्यासाठी लोकांना या दरीमार्गे जुन्या वाटेतून जावं लागत होतं. नंतरच्या काळात लोखंडी पूल बांधला गेला. पण जेव्हा वाद सुरु झाला. तेव्हा पोलीस लोखंडी पूलाभोवती होती. पण काही जमाव जुन्या मार्गानं वर शिरला. यानंतर खालीच थांबलेल्या जमावानं किल्ल्यापासून अनेक किलोमीटर दूर असलेले आणि अतिक्रमनाशी संबंध नसलेल्या गजापूर गावात तोडफोड केली. तोडफोडी प्रकरणी पुण्याच्या हिंदू बांधव समितीचे रवींद्र पडवळ, सेवा व्रत प्रतिष्ठानचे बंडा साळोखे यांच्यासह 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अतिक्रमण विशाळगडावर आहे, म्हणजे ज्या ठिकाणी जमावानं तोडफोड केली. या गडापासून जवळपास ३ किलोमीटर लांबलेल्या गजापूर गावात या गावांचा अतिक्रमणाशी कोणताही संबंध नव्हता. तरीही तिथल्या घरं-दुकानं-वाहनांची हिंसक जमावानं तोडफोड केली. पोलीस असूनही कायदा कुणी हाती घेतला. ज्यांचा अतिक्रमणाशी काहीही संबंध नाही. त्यांना लक्ष्य का केलं गेलं. यावरुन विरोधक सरकारला प्रश्न करत आहेत. तर विशाळ गडावरील अतिक्रमण निघाल्यानंतर मविआच्या पोटात दुखण्याचं काय काम. असं उत्तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय.
राज्य सरकारने हा विषय आता तरी खूप संवेदनशीलपणे हाताळायला हवा. पुरातत्त्व विभागाने इतर किल्ल्यांवर अशा काही प्रकारचे अतिक्रमण होणार नाहीत याची दक्षता घ्यायला हवी. तसेच महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी खरंच काहीतरी मौल्यवान कामगिरी व्हावी, अशी सरकारकडे शिवप्रेमींची आशा आहे. शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्याचं संवर्धन झालं तर त्यांचा इतिहास पुढच्या अनेक पिढ्यांना अनुभवता येईल. किल्ल्यांचं अस्तित्व पाहून पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि जगण्याची एक सकारात्मक उमेद मिळेल.