मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना जेजे रुग्णालयातून आर्थर रोड जेलमधील रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे. नवाब मालिक यांना किडनीच्या आजारामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नबाब मलिक यांची प्रकृती चिंताजनक असल्याची नवाब मलिक यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर माहिती दिली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. ईडीकडून नवाब मलिक यांच्या आरोग्याविषयीचा जेजे रुग्णालयाचा अहवाल मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) सादर करण्यात आला आहे. त्यानुसार ते किडनीच्या आजारामुळे त्रस्त असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना जामीन मिळावा, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे, त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. घरचे जेवण मिळावे, यासाठीही मलिक यांच्यातर्फे न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. दरम्यान, वैद्यकीय जामीन आणि घरचे जेवण मिळावे, या दोन्ही अर्जांवर आज मुंबई सत्र न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मलिकांच्या अडचणीत वाढच झाली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारली नाही आणि दुसरीकडे पीएमएलए न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 6 मेपर्यंत वाढवली. त्यामुळे मलिकांचा पाय आणखी खोलता गेला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती, मात्र त्या ठिकाणीही त्यांची निराशा झाली. ज्याअंतर्गत उच्च न्यायालयाने त्यांच्या तत्काळ सुटकेचा अंतरिम अर्ज फेटाळला आणि मलिकांसमोरचा तो पर्यायही संपला. त्यामुळे आता त्यांच्या प्रकृतीचे कारण देत त्यांच्या वकिलांकडून जामीन मागण्यात आला, मात्र त्यालाही ईडीने विरोध केला. आता आज काय निर्णय होते, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.