मुंबई : महाराष्ट्रात पर्यटनाचं स्वरुप बदलत आहे. अशी अनेक ठिकाणं होती की त्या ठिकाणी कितीही जावं वाटलं तरी जाता जायचं नाही कारण ती ठिकाणं सर्वसामान्यांना खुली नव्हती. यामध्ये सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेलं येरवडा जेल (Yerwada jail) आणि मुंबई महापालिकेची इमारत (BMC Building)….! या दोन्हीही वास्तू राज्य सरकारने सर्वसामान्यांना खुली करुन नरजेआड असणारं वैभव आता जगासमोर आणलं आहे. (The New Change of Maharashtra Tourism Jail Tourism to BMC Heritage Walk)
कारागृहातील ऐतिहासिक स्थळे दाखवून, त्या काळच्या घटनांचे साक्षीदार होण्यासाठी तसंच त्यावेळची रोमांचकता अनुभवण्यासाठी आणि त्यातून प्रेरणा मिळावी, या हेतूने राज्य सरकारने महाराष्ट्रातील कारागृहांत ‘जेल टूरिझम’ सुरु करण्याची घोषणा केली.
प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधून 26 जानेवारीपासून राज्यातील सर्वात मोठ्या येरवडा कारागृहातून जेल टूरिझमला सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या उपक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन केले. मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्री अनिल देशमुखही कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते तर या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: येरवडा जेलमध्ये हजर राहिले होते. तसंच याअगोदर फक्त जेल भरो व्हायचं (प्रसिद्ध जेल भरो आंदोलन ) मात्र यानंतर आता आपण जेल पर्यटन सुरु करत आहोत, या गोष्टीचा मला आनंद आहे, अशी कोटीही जेल टूरिझमवर मुख्यमंत्र्यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक पुणे करार याच येरवडा जेलच्या आताच्या गांधी यार्डात झाला. जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल, मोतीलाल नेहरु यांचंही काही काळ येरवडा जेलमध्ये वास्तव होतं. एकंदरितच स्वातंत्रपूर्व काळातील घटना आणि त्या घटनांचा ऐतिहासिक ठेवा आपल्याला या जेल टूरिझममधून अनुभवता येणार आहे.
जेल पर्यटन ही कल्पनाच वेगळी आहे. जेलमध्ये नेमकं कसं वातावरण असतं, तिथे काय काय घडतं, तिथे वागणूक कशी मिळते? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या डोक्यात असतात. मात्र आता याच प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्यांना जेल टूरिझम या संकल्पनेतून मिळणार आहे.
येरवडा कारागृहात असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राचं वाचन येरवडा कारागृहातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच गतकाळातील अनेक संदर्भ देत जेल पर्यटन ही कल्पनाच वेगळी आहे. पण या उपक्रमाबद्दल कदाचित टीका होण्याची शक्यता आहे. जितक्या व्यक्ती तितकी वेगवेगळी मत असतात. येरवडा कारागृहाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना म्हणजे या कारागृहाचे बांधकाम आहे. या कारागृहाला 150 वर्ष पूर्ण झालीत, असं अजित पवार पवार म्हणाले.
गॉथिक शैलीतील मुंबई महापालिकेची सफर पर्यटकांना करता यावी म्हणून मुंबई महापालिकेने हेरिटेज वॉक सुरु केलं आहे. या निमित्ताने पर्यटकांना मुंबई महापालिकेची ऐतिहासिक इमारत पाहता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (29 जानेवारी) या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या सोहळ्याला स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती ठाकरे, मुंबईच्या महारौर किशोरी पेडणेकर ही सर्व मान्यवर मंडळी सांयकाळी 5.30 वाजताच महापालिकेत हजर झाली. मुख्यमंत्र्यांचं पालिकेत आगमन झाल्यानंतर सर्वच नेते पालिकेच्या गॅलरीत गेले. या नेत्यांनी पालिकेत हेरिटेज वॉक केला. पालिकेच्या मुख्य गॅलरीत येऊन हे नेते थांबले. काही काळ त्यांनी पालिकेच्या या प्रेक्षणीय गॅलरीत उभं राहून गप्पाही मारल्या.
आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत आता सर्वसामान्यांनाही पाहता येणार आहे. पालिकेने हेरिटेज वॉक सुरू करून हा ऐतिहासिक ठेवा नागरिकांसाठी खुला केला आहे. दर शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना पालिकेत येऊन हेरिटेज वॉक करता येणार आहे.
“मुंबई महापालिकेत याआधी येण्याची संधी मिळाली नव्हती. ही संधी आज आदित्यमुळे मिळाली आणि इथे येता आलं. कधी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना वाटलं नाही, अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत. त्यांनाही ही इमारत दाखवावी. मी हे लक्षात ठेवणार आहे. शेवटी माझ्या लेकालाच वाटलं मला इथे आणावं”, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.
(The New Change of Maharashtra Tourism Jail Tourism to BMC Heritage Walk)
हे ही वाचा :
Special Story : जेव्हा हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्राचं विधिमंडळ जळण्यापासून वाचविले…!