मुंबई : महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) शाळांमधून आता विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षाणासोबतच अत्याधुनिक सोई-सुविधा पुरवण्यात येत आहेत. त्याचा फायदा म्हणजे दिवसेंदिवस महापालिकेच्या शांळामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची (Student) संख्या वाढू लागली आहे. महापालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी 14 एप्रिलपासून महापालिकेच्या वतीने ‘मिशन अॅडमिशन-एकच लक्ष्य-एक लक्ष’ ही मोहीम राबवण्यात आली आहे. महापालिकेच्या या मोहिमेला पालकांचा जोरदार प्रतिसाद लाभत असून, आतापर्यंत या मोहिमेंतर्गत 90 हजार विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. महापालिकेने एक लाख विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उदिष्ट गाठण्याच्या शेवटच्या टप्प्यात महापालिका पोहोचली आहे. महापालिकांच्या शाळेचा दर्जा उंचवण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वतीने देखील प्रयत्न करण्यात आले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी विविध उपक्रम देखील राबवण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली होती. अत्याधुनिक सोई-सुविधांची कमतरता तसेच शिक्षणाचा दर्जा या गोष्टी लक्षात घेऊन पालक आपल्या पाल्यांना खासगी शांळामध्ये प्रवेश देत होते. मात्र आता विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने देखील कंबर कसली आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश कसे वाढवले जातील याकडे सध्या विशेष लक्ष देण्यात येत आहेत. यातूनच महापालिकेच्या शांळामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आता अत्याधुनिक सोईसुविधा देखील पुरवण्यात येत आहेत.
पूर्वी मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये एकूण 2 लाख 98 हजार एवढ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश होता. त्यानंतर महापालिकेच्या शांळामध्यील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी महापालिकेच्या वतीने’मिशन अॅडमिशन-एकच लक्ष्य-एक लक्ष’ ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमुळे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 90 हजारांनी वाढली. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांचा आकडा 3 लाख 82 हजारांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे यात मराठी शांळामध्ये 16 हजार विद्यार्थ्यांची भर पडली आहे.