मुंबई : खाऊन खाऊन 50 खोके, माजलेत बोके माजलेत बोके, ईडी सरकारचे करायचे काय-खाली डोके वर पाय, 50 खोके एकदम ओके, 50 खोके 50 खोके माजलेत बोके, माजलेत बोके, अशा घोषणाबाजीने विधानभवनाचा (Vidhan Bhavan) परिसर दणाणून गेला. विरोधकांनी आजही विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत आंदोलन केले. विशेष म्हणजे सत्ताधारी आमदारांनीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन (Protest) केले. काल सत्ताधारी विशेषत: शिंदे गटाचे आमदार आणि विरोधी पक्ष आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली होती. आज दोघांनीही घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांनी करत सरकारचा निषेध केला. राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy rain) प्रचंड नुकसान झाले. मात्र मदत देणे तर दुरच मात्र केवळ राजकारण सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र आजही विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विशेषत: शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. 50 खोके एकदम ओके अशा घोषणाबाजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक करीत असून पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला होता. 50-50 बिस्कीट पुडे घेऊनही विरोधकांनी आंदोलन केले होते. हातात फलक घेऊन जोरजोरात घोषणाबाजी विधानभवनाच्या पायऱ्यांवर करण्यात आली. आजही महाराष्ट्र के गद्दारोंको, जुते मारो, सालों को, ओला दुष्काळ जाहीर करा, नाही तर खुर्च्या खाली करा, अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या.
विरोधकांची घोषणाबाजी तर पाहायला मिळालीच. मात्र तत्पूर्वी सत्ताधाऱ्यांनीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर आधीच येत विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. लवासाचे खोके एकदम ओके, महसूलचे खोते, सोनिया ओके अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. विरोधकांच्या खोक्यांच्या घोषणेवर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. आम्ही एकही रुपया घेतलेला नाही. केवळ बाळासाहेबांचा विचार आणि आणि हिंदुत्वासाठी आम्ही भाजपासोबत गेलो, असे स्पष्टीकरण देण्याची वेळ शिंदे गटातील आमदारांवर आल्याचे यानिमित्ताने दिसून आले.