मुंबई : मुंबईकर ज्या फेस्टिव्हलची आतुरतेने वाट पाहतात आणि मुंबईतील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळख असलेला काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात झाली आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलचे यंदाचे 20 वे वर्ष आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही फेस्टिव्हलमध्ये कला, क्राफ्ट, सिनेमा, नाटक, नृत्य, संगीत, इंस्टावलेशन साहित्यासंबंधी अनेक ऍक्टिव्हिटीज येथे पाहायला मिळत आहेत. तसेच यंदा महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून विविध कलाकृतींच्या माध्यमातून त्यांना मानवंदना देण्यात आली आहे. येत्या 10 फेब्रुवारीपर्यंत मुंबईकरांना आणि कलाप्रेमींना या काळाघोडा फेस्टिव्हलमध्ये विविध कलांचा आनंद घेता येणार आहे आणि हा फेस्टिव्हल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर गर्दी करत असतात.
या फेस्टिव्हलची सुरुवात 1999 मध्ये करण्यात आली. हा फेस्टिव्हल मुंबईच्या काळा घोडा परिसरातील स्ट्रीटवर गेले 20 वर्ष भरवण्यात येत आहे. याला देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक फेस्टिव्हल म्हणून ओळखले जाते. येथे देशातून अनेक कलाकार येऊन आपली कला सादर करतात, तर नवोदित कलाकारांना कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन आणि खुले व्यासपीठ देण्यात येते. या फेस्टिव्हलमध्ये कला, क्राफ्ट, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य, संगीत ,विविध राज्यातील स्टॉल ,मुलांसाठी वेगळे सेक्शन, इनोव्हेटिव इंस्टॉलेशन सर्व पाहायला मिळते.
यंदा या फेस्टिवलचे आकर्षण म्हणजे 7 तोंडी सफेद रंगाचा घोडा आहे. या घोड्याचे 7 तोंड म्हणजे मुंबईची 7 बेटे. घोड्याला पंख नसतात, पण या घोड्याला 2 पंख आहेत आणि या पंखावर 150 पिसं काढली गेली आहेत. ही 150 पिसं म्हणजे महात्मा गांधींची 150 वी जयंती आणि त्यातून ही मानवंदना दिली आहे. तसेच या घोड्यावर गांधीजींची 3 माकडे आणि चरखा ही पेंट केला आहे. “रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम ” लिहून मानवंदना दिली आहे.
या फेस्टिव्हलमध्ये अजूक एक आकर्षण म्हणजे, लाल रंगाची फियाट कार. येथे लोक सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत आहेत. या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची ही कार आहे आणि या कारवार लाल रंग टाकून ती अधिकच आकर्षक दिसत आहे. 1964 साली त्यांनी PNB बँकेचे 5000 कर्ज काढून ही कार घेतली होती.