चोरट्याने घरफोडी केली..अन् दुसऱ्या दिवशी परत आला भित्तीवरील फोटो पाहून सर्व वस्तू परत केल्या…

| Updated on: Jul 16, 2024 | 7:37 PM

बंद घरातील सर्व वस्तू चोरट्याने चोरल्या आणि तो दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच घरात चोरी करायला शिरला. त्याने सर्व वस्तू जमा केल्या आणि निसटणार इतक्याच घरातील एका फोटोवर त्याची नजर खिळली आणि त्याचे मनपरिवर्तनच झाले....

चोरट्याने घरफोडी केली..अन् दुसऱ्या दिवशी परत आला भित्तीवरील फोटो पाहून सर्व वस्तू परत केल्या...
Follow us on

कामगार आहे मी तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे….

…..अशी अजरामर कविता लिहून मजूर, गिरणी कामगारांचे विश्व आपल्या काव्यातून मांडणारे मराठीतील प्रख्यात कवी नारायण सुर्वे यांच्या मुलाच्या रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील घरात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. स्वर्गीय नारायण सुर्वे यांचे पुत्र विरार येथे आपल्या मुलाबरोबर गेले असताना त्यांच्या घरात चोरट्याने प्रवेश केला. आधी एलईडी टीव्ही आणि अन्य वस्तू चोरी केल्या. चोर दुसऱ्या दिवशी चोरी करण्यासाठी पुन्हा आला तेव्हा त्याला प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे याचं हे घर असल्याचे समजले आणि त्याला पश्चाताप झाला. चोराने अखेर भिंतीवर एक चिट्टी लिहून माफी मागत चोरलेल्या वस्तू परत केल्याची अनोखी घटना घडली आहे. चोरटयाने ज्या घरातून मौल्यवान वस्तू चोरल्या ते एका प्रसिद्ध मराठी कवीच्या घरातील असल्याचे लक्षात आल्यानंतर एका चोराला पश्चाताप झाला आणि त्याने चोरलेल्या मौल्यवान वस्तू परत केल्या असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.

नारायण सुर्वे यांची कन्या सुजाता आणि तिचे पती गणेश घारे सध्या या नेरळ येथील घरात राहातात. ते विरार येथे त्यांच्या मुलासह नातेवाईकांकडे गेल्याने त्यांचे घर दहा दिवस बंद होते. या काळात चोरट्याने घराचे लॉक तोडत घरात प्रवेश केला आणि काही वस्तू चोरल्या.त्यात एलईडी टीव्ही सेट अन्य वस्तू होत्या. दुसऱ्या दिवशी आणखी काही वस्तू चोरण्यासाठी जेव्हा चोराने घरात प्रवेश केला. तेव्हा कवी नारायण सुर्वे यांचा फोटो आणि त्यांच्या जतन केलेल्या वस्तू पाहील्या तेव्हा चोराला धक्का बसला. हे नारायण सुर्वे यांच्या घरी आपण चोरी केल्याचा त्याला पश्चाताप झाला. अखेर त्याने या वस्तू तेथेच ठेवून एक चिट्टी लिहून भित्तीवर चिकटवली.

हा चोर चांगला शिकलेला होता.त्याला एवढ्या थोर साहित्यिकाच्या घरी चोरी केल्याबद्दल पश्चाताप वाटला.त्याने चोरलेल्या सर्व वस्तू परत केल्या. एवढ्या मोठ्या साहित्यिकाच्या घरातून चोरी केल्याबद्दल घराच्या मालकाची माफी मागणारी एक छोटीशी चिठ्ठी चोराने भिंतीवर चिकटवली. रविवारी विरारवरुन सुजाता आणि त्यांचे पती घरी आले तेव्हा त्यांना ही चिट्टी आढळली असे नेरळ पोलिस ठाण्याचे शिवाजी ढवळे यांनी सांगितले. एलईडी टीव्ही आणि इतर वस्तूंवरील बोटांच्या ठशांवरुन पोलिसांनी चोराचा शोध घेणे सुरु केले आहे.

नारायण सुर्वे यांनी अनेक कविता लिहील्या आहेत. त्यांची पंडित नेहरु यांच्या निधनानंतर लिहीलेली कविता अजरामर आहे.  1926-27 च्या काळात चिंचपोकळी येथील एका कापड गिरणीसमोर बेवारस अवस्थेत फेकल्या एका अनाथ मुलाला गंगाराम या गिरणी कामगाराने उचलून आणले आणि त्यांची पत्नी काशीबाई यांनी त्यांना वाढविले आणि आपले नाव दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत वाढलेल्या नारायण सुर्वे यांचे आयुष्य पुढे काबाडकष्ट करण्यात गेले. दादरच्या अप्पर माहीम पालिका शाळेत नारायण सुर्वे 1936 साली 4 थी पास झाले. त्याच वेळी गंगाराम सुर्वे गिरणीतून सेवानिवृत्ती घेऊन कोकणात कायमचे गेले. जाताना त्यांनी नारायण सुर्वे यांना केवळ दहा रुपयांची नोट दिली होती. मग भाकरीचा चंद्र शोधण्यात त्यांचे आयुष्य गेले.

84 वर्षी मुंबईत निधन

एका सिंधी कुटुंबात घरगडी म्हणून काम करण्यापासून ते हॉटेलात कपबशा विसळण्यापासन ते हरकाम्या म्हणून त्यांनी काम करीत नारायण सुर्वे जीवन जगले. नंतर ते गिरणीत कामाला लागले. नंतर त्यांनी कम्युनिष्ट चळवळीत काम केले. मुंबई महापालिकेच्या ज्या शाळेत सुर्वे यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले त्याच शाळेत सुर्वेंना शिपाई म्हणून नोकरी लागली.नोकरी करता करता ते शिकले त्यानंतर त्यांना शिक्षकाची सनद मिळाली. 1969 मध्ये नायगावच्या महापालिका नं. 1 शाळेत ते शिकवू लागले. तेव्हापासून ते गिरणगावचे सुर्वे मास्तर झाले. 1958 मध्ये ‘डोंगरी शेत माझं गं…’ ही त्यांची कविता ‘नवयुग’ मासिकात प्रसिद्ध झाली. एचएमव्हीने त्याची ध्वनिफीत काढली आणि कवितेतील सुर्वे युग सुरू झाले. नारायण सुर्वे यांचे 16 ऑगस्ट 2010 रोजी वयाच्या 84 वर्षी मुंबईत निधन झाले.