मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. सोमय्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं ट्विटरवर ट्रेंड सुरु झालाय.. किरीट सोमय्या, संजय राऊत आणि अनिल परब यांची जुनी वक्तव्ये आता पुन्हा व्हायरल होऊ लागली आहेत..किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह अवस्थेतला कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटानं राज्यभरात आंदोलन सुरु केलंय.
सोमय्यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं, सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आक्षेपार्ह अवस्थेतला कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोमय्या ट्विटरवर प्रचंड ट्रेन्ड झाले आहेत. विरोधी पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांनी सोमय्यांविरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरवर तर मीम्सचा अक्षरश: पाऊस पडलाय. सोमय्यांचीच काही जुनी दृश्यं आणि काही जुनी वक्तव्ये पुन्हा व्हायरल होऊ लागली आहेत.
सर्वात जास्त व्हायरल झालेला व्हिडीओ आहे तो खडसेंनी सोमय्यांना दिलेल्या एका सल्ल्याचा, एका कार्यक्रमात खडसेंनी सोमय्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता. खासदार असताना सोमय्यांनी पश्चिम बंगालमधल्या महिलांच्या कथित अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता. लोकसभेत सोमय्या प्रचंड आक्रमक झाले होते, ट्विटरवरच्या ट्रोलर्सनी तोही व्हिडीओ पुन्हा व्हायरल केलाय. किरीट सोमय्यांचे महिलांबद्दलचे आचार आणि विचार असं कॅप्शन त्या व्हिडीओला देण्यात आलंय..
खार पोलिस स्टेशनच्या बाहेर किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सोमय्या किरकोळ जखमी झाले होते. जखमी झाल्यानंतर सोमय्या बराच वेळ आपल्या गाडीत बसून होते. विरोधकांनी तोही व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल केलाय. दापोलीतल्या साई रिसॉर्टवर जाताना सोमय्या हातोडा घेऊन गेले होते. मढमधल्या अनधिकृत बांधकामाच्या तोडकामाप्रसंगीही सोमय्यांनी हातोडा नेला होता. सोमय्यांचा तोच हातोडा आता व्हायरल होऊ लागलाय.
विरोधी पक्षाचे अनेक नेते सोमय्यांच्या आरोपांमुळं अडचणीत आले होते. सोमय्या प्रत्येक नेत्याकडून हिशोब मागायचे. मिडीयासमोर येतानाचं सोमय्यांचं एक वक्तव्य फार गाजायचं. तेच वक्तव्य आता विरोधक व्हायरल करतायत. किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संजय राऊत यांची जुनी वक्तव्ये व्हायरल झाली आहेत.
दापोलीतल्या साई रिसॉर्ट प्रकरणात किरीट सोमय्यांनी रान उठवलं होतं. अनिल परब यांच्याविरोधात त्यांनी आरोपांची माळ लावली होती. त्याचवेळी अनिल परब यांनी केलेलं एक वक्तव्य आता व्हायरल होऊ लागलंय. सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर चित्रा वाघ यांना प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ आक्रमक झाल्या होत्या. मग आता सोमय्या प्रकरणात त्या काहीच का बोलत नाहीत असं ट्विट काहीजणांनी केलंय…
सत्ताधारी पक्षातल्या काहीजणांनीही सोमय्यांची अडचण केलीय. बच्चू कडूंनी किरीट सोमय्यांवर टीका केलीय. अजित पवारांच्या गटानं भाजपला पाठिंबा दिलाय. पण त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते असलेल्या सूरज चव्हाण यांनी किरीट सोमय्यांवर ट्विट करत निशाणा साधलाय. शेवटी तावडीत सापडलाच असं ट्विट सूरज चव्हाण यांनी केलंय. सोमय्यांच्या कथित आक्षेपार्ह क्लिपचा विषय विधानपरिषदेतही चांगलाच गाजला.
अंबादास दानवे यांनी सोमय्यांच्या क्लिप असलेला पेनड्राईव्ह विधानपरिषद उपाध्यक्षांकडे सोपवला. अनिल परबांनीही जळजळीत टीका करत सोमय्यांचं संरक्षण काढण्याची मागणी केली. विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष असलेल्या नीलम गोऱ्हे यांनीही पेनड्राईव्ह स्वीकारताना टोला मारलाच. सोमय्या सोशल मिडीयावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. आपल्या प्रत्येक हालचालींची माहिती ते ट्विट करुन देत असतात. सोशल मिडीयावर कधीकधी ते ट्रेंडिंगवरही असतात यावेळीही हॅशटॅग किरीट सोमय्या ट्रेंड करतोय पण त्यामागचं कारण मात्र वेगळं आहे.