मुंबई – शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी इशारा दिलाय. ते म्हणाले, राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते शिवाजी महाराजांवर बोलत राहिले, तर सरकारमध्येच वितुष्ट निर्माण होईल. त्याचे परिणाम दोन्ही गटाला भोगावे लागतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, एक दिवस या सगळ्या गोष्टीमुळं दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होऊ शकेल. त्याचे परिणाम दोघांनाही भोगावे लागतील. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपला हा इशारा दिलाय.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबदद्ल राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते हे अपमानास्पद बोलतात. भाजपच्या नेत्यांशी शिवाजी महाराज यांच्याबद्दल विचार करून बोललं पाहिजे. यानंतर अशाप्रकारचा अपमान आम्ही लोकं सहन करणार नाही. वरिष्ठ भाजपच्या नेत्यांच्या लक्षात आणून देऊ. शिवाजी महाराज यांचा अपमान नेहमी होत असेल तर हे काही चांगलं नाही, असंही संजय गायकवाड म्हणाले.
दुसरीकडं संजय राऊत हे शिंदे गटाच्या आमदारांवर तुटून पडतात. स्वाभिमानाच्या गोष्टी सांगून शिवसेना फोडली. मग आता स्वाभिमान कुठं गेला. शिंदे राजीनामा कधी देणार, असा थेट सवाल संजय राऊत यांनी शिंदे यांना केलाय.
औरंगजेबाचे आणि अफजलखानाच्या कबरी खोदण्याचे नाटकं कशाला करता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली. स्वाभिमानाचं तुणतुण वाजवत भाजपसोबत गेलेत. आता कुठं गेला तुमचा स्वाभिमान. अद्याप शिंदे गटाच्या आमदारांकडून निषेध करण्यात आला नाही. इतके तुम्ही घाबरता का, असा सवाल संजय राऊत यांनी शिंदे गटाला विचारला.
अशा अपमानानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. शिवाजी महाराज यांना माफीवीर म्हटलं. तरीही तुम्ही सत्तेला चिटकून आहात. महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.