मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची युतीची चर्चा सुरू आहे. ही युती जवळ जवळ झाल्यात जमा आहे. फक्त जाहीर घोषणा होणं बाकी आहे. असं असताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली तर त्यांच्याशी युती होऊ शकते, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानाचे अनेक राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत.
आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करायची आहे. आम्ही त्यांना तसा प्रस्ताव दिला आहे. युतीची चर्चा झाली आहे. ती आम्ही जाहीर करू. युती झाल्याचं जाहीर करायचं हे शिवसेनेने ठरवायचं आहे. ते जाहीर होईपर्यंत मी कुणालाही भेटलो तरी राजकीय चर्चा सुरू राहील, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याशी भेटीगाठी होतच राहील. पण प्रत्येक भेट राजकीयच असेल असं नाही. तो संबंध लावणं चुकीचं आहे. त्यांनी भाजप सोडला तरच राजकीय चर्चा होऊ शकते. नाही तर होऊ शकत नाही, असं सांगतानाच शिवसेनेत असतानाही एकदा युतीची चर्चा झाली होती. तेव्हाही भाजप सोडा, आम्ही तुमच्यासोबत येतो असं आम्ही शिवसेनेला सांगितलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
ज्या पक्षांसोबत भाजपची युती आहे. त्या पक्षांसोबत आम्ही जाणार नाही ही आमची भूमिका जगजाहीर आहे. कारण आमचं भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत तात्त्विक भांडण आहे. आम्ही जी व्यवस्था नाकारली. तीच व्यवस्था संघाला आणायची आहे. त्यामुळे आम्ही भाजपसोबत कधीच जाणार नाही. याची जाणीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मी गेल्या पंधरा दिवसांपासून उद्धव ठाकरेंना भेटलो नाही. मी महिनाभर महाराष्ट्राबाहेर आहे. आमची टीम आणि शिवसेनेची टीम जागा वाटपावर बोलत होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मी भेटलो तर मुख्यमंत्री मला भेटायला बोलावतात. हे दबावाचं राजकारण आहे का? या तुमच्या प्रश्नात काही तथ्य नाही. कारण आम्ही शिवसेनेसोबत युती करणार आहोत, हे निश्चित आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.