मुंबई- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचेच नाव देण्याचा निर्णय झाला आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नावाबाबत होकार दिला आहे. बाळासाहेबांचे नाव मी दिलं नाही, असंही ते म्हणालेत. दि बा पाटील (D. B Patil) यांच्या नावाला माझा कुठलाही विरोध नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या नावावर शिक्कामोर्तब केलंय. मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांसमोर याबाबत माहिती दिली. प्रकल्पग्रस्त (Projected) भूमिपुत्रांनी दि. बा. पाटलांच्या नावाची मागणी केली होती. ही त्यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.
प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांची इच्छा होती. ती इच्छा मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं होतं. त्या पत्राच्या विनंतीनुसार मुख्यमंत्र्यांनी कोली, भंडारी या काही समाजाच्या लोकांना इथं बोलावलं. तुमच्या भावनांचा विचार करून नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचं आज सगळ्यांसमोर जाहीर केल्याचं एका प्रकल्पग्रस्तानं सांगितलं.
दि. बा. पाटील यांचे पूर्ण नाव दिनकर बाळू पाटील. त्यांचा जन्म उरण तालुक्यातील जासई इथं झाला. ते व्यवसायानं वकील होते. पनवेलचे नगराध्यक्ष, चार वेळा आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास. शेतकरी कामगार पक्षातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. नवी मुंबईतील अनेक विकासकामांत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
दि. बा. पाटील यांच्या व्यतिरिक्त राज्य सरकारनं बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. बंजारा समाजानं या विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं, अशी मागणी केली होती. सिडकोची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची होती. त्यामुळं त्यांचं नाव विमानतळाला द्यावं, अशी मागणी पोहरादेवची मनंत सुनील महाराज यांनी केली होती. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवी मुंबईचं विमानतळ स्वतंत्र नाही. त्यामुळं जे नाव मुंबई विमानतळाला तेच नाव नवी मुंबई विमानतळाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं देण्यात यावं, असं म्हटलं होतं. नाव कोणतं द्यायचं यावरून वरीच चर्चा सुरु होती. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी दि. बा. पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं, यासाठी आंदोलनं केली होती. शेवटी प्रकल्पग्रस्तांची मागणी मान्य करण्यात आली.