मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (28 नोव्हेंबर) मोठ्या दिमाखात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी महाविकासआघाडीच्या इतर 6 नेत्यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र, असं असतानाही या शपथग्रहणाला थेट चोरांचंच ग्रहण लागल्याचं समोर आलं आहे (Thieves in Swearing in ceremony of Uddhav Thackeray). चोरांनी या कार्यक्रमात आपला हात साफ करत तब्बल पावणेचार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला (Thieves in Swearing in ceremony of Uddhav Thackeray).
मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातून अनेक लोक आले होते. त्यामुळे शिवाजी पार्क येथील मैदानावर मोठी गर्दी झाली. याच गर्दीचा फायदा घेत चोरांनी रोख रक्कम, सोन्याची चेन आणि पाकिट अशा अनेक गोष्टी चोरल्या. चोरट्यांनी एका शिवसैनिकाची 3 तोळ्याची सोन्याची चेनही चोरली.
कार्यक्रम सुरु झाल्यानंतर चोरांनी शपथविधी कार्यक्रमात शिरकाव करुन एकूण 3 लाक 78 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. अनेकांना आपले खिसे कापले गेल्याचं समजताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी जवळपास 14 तक्रारदारांनी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी याच तपास सुरु केला आहे.
विशेष म्हणजे शपथ ग्रहण सोहळ्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अनेक ठिकाणी सीसीटीव्हीची देखील करडी नजर होती. तरीही चोरांनी पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचा फज्जा उडवल्याने अनेक नागरिकांना याच फटका बसला.