मुंबई : मुंबई मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन 19 जानेवारी रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे मुंबईकरांना चांगली वाहतूक सुविधा मिळावी यासाठी संपूर्ण सुसज्जता करण्यात आली आहे. या योजनेत काही आश्चर्यकारक स्थापत्यशैलीचे बदल मुंबईकरांसाठी करण्यात आले आहेत, ते काय आहेत ते पाहूया..
मुंबई मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 डहाणुकरवाडी–दहीसर–आरे कॉलनी असा एकूण 20 किमीचा पहिला टप्पा गेल्यावर्षी एप्रिलमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू करण्यात आला होता. आता या मार्गिकेच्या गोरेगाव ते गुंदवली ( अंधेरी, प.) हा दुसरा टप्पा सेवेत येणार आहे. या मार्गिकेच्या सर्व यंत्रणांची तपासणी करून रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे.
मेट्रो मार्ग 2 अ मार्गिकेच्या अंधेरी (प) मेट्रो स्टेशनवर अतिरिक्त कॉन्कोर्स लेव्हल बांधण्यात आला आहे. ज्याला प्रॉपर्टी डेव्हलपमेंट (PD) लेव्हल असे म्हणतात. अंधेरी (प.) मेट्रो स्थानक मेट्रो मार्ग 2अ च्या मधील शेवटचे आणि तीन मजली सिंगल पिअर कॅंटिलीव्हर स्थानक आहे. ज्यामध्ये प्रॉपर्टी डेव्हलपमेंट लेव्हल, कॉन्कोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म लेव्हल यांचा समावेश आहे. अंधेरी (प.) स्टेशनला लिंक रोडच्या दोन्ही बाजूंना पदपथांनी जोडले आहे.
या स्थानकाच्या प्रॉपर्टी डेव्हलपमेंट या पहिल्या मजल्यावरील व्यावसायिक जागेमुळे प्राधिकरणाला दरमहा अंदाजे 70 लाख रुपये नॉन-फेअर बॉक्स महसूल मिळविण्याचा अंदाज आहे. डी. एन. नगर मेट्रो स्थनाकाजवळ मेट्रो 1 च्या मर्गिकेवरून मेट्रो 2 अ ची मार्गिका सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी या मर्गिकेची उंची जमिनीपासून सुमारे 22 मीटरने वाढवावी लागली. परिणामी प्लॅटफॉर्म उंची साधारण प्लॅटफॉर्मच्या उंचीपेक्षा 8 मीटरने वाढली. त्यामुळे या अतिरिक्त जागेचा सुनियोजित वापर करण्याकरीता एक मजला वाढवला आहे.
मेट्रो मार्ग 2अ आणि 7 सुरू झाल्यावर लाखो प्रवाशांना याचा फायदा होईल. अंधेरी (प.) हे स्थानक मेट्रो मार्ग 1 सोबत जोडलेले असल्याने हे स्थानक अंदाजे 30 हजार प्रवाशांना सेवा देईल. अंधेरी (प.) वरून उत्तर किंवा पूर्व दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ते महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे दहिसर, गोरेगाव ते घाटकोपरपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी म्हटले आहे.