मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे राज्य कारभारासाठी नालायक असल्याची जहरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण मुख्यमंत्री तेलंगणात प्रचार करत आहेत. राज्यात सरकार आहे की नाही, असा प्रश्न पडला आहे. हवामान खात्याने इशारा दिल्यानंतर पण सरकारने काय केले असा सवाल त्यांनी केला. आज त्यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली. त्यात राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांवर त्यांनी आरोपांची राळ उडवली.
हे तर असंवैधानिक सरकार
राज्यात सध्या असंवैधानिक सरकराचा कारभार सुरु आहे. पण हे सरकार आहे की नाही, असा प्रश्न पडला आहे. मुंबईत एवढं प्रदूषण आहे. नियोजन शून्य विकास कामांमुळे धूळ झालेली आहे. राज्य सरकारने ठरवले होते की कृत्रिम पाऊस पाडू. त्यांच्याकडे सगळं कृत्रिमच आहे. पण तो कृत्रिम पाऊस पाडता आला नाही. सुदैवाने मुंबईत पाऊस पडला आणि प्रदुषण कमी झालं असावं.
अवकाळी पावसाने नुकसान
मुंबई व्यतिरिक्त अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी नुकसान झालं आहे. डिसेंबरला कांदा काढणीला आला असता तोही गेला, आता कांदाच गेला आता काय करणार? मी सुद्धा अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो. काही गोष्टी मुख्यमंत्र्यांना बसल्या जागी करता येतात. त्यांनी राज्यातील परिस्थितीविषयी माहिती घ्यायला हवी. मुख्यमंत्री स्वतःचे घरं सोडून दुसऱ्याचं घर धुंडाळतात. मुख्यमंत्री तेलंगाणात कोणत्या भाषेत बोलणार, असा सवाल पण त्यांनी विचारला. त्यांना घर सांभाळता येईना आणि ते गेले प्रचाराला असा टोला त्यांनी हाणला.
दिवाळीत फटाक्यांचा आवाज, मुंडेंचा आवाज ऐकू आला नाही
हवामान खात्याने इशारा देऊन देखील सरकारने काय केलं, असा सवाल त्यांनी विचारला. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं, मदत दिली नाही तर मी दिवाळी साजरी करणार नाही. पण मला ते नंतर दिसले नाहीत. दिवाळीत फटक्यांचा आवाज आला. पण कृषीमंत्र्यांचा आवाज ऐकू आला नाही, असा चिमटा त्यांनी काढला. शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली का? असा सवाल त्यांनी केला. काहींना 20 रुपयांचा चेक मिळाला, ही शेतकऱ्यांची थट्टा झाली. विमा कर्मचाऱ्यांना चाबकाचे फटके द्यायला हवे असा संताप त्यांनी व्यक्त केला.
ते राज्य काय सांभाळणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंचतारांकित शेती करत आहे. ते शेतात हेलिकॉप्टरने पोहचतात. गरीब शेतकरी पायवाट तुडवत शेतात जातो. इथं राज्यात गाई-वासरे मरुन पडत आहेत. हे दुसऱ्या राज्यात जाऊन प्रचार करत आहेत. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात. हे सरकारचं तेरावा महिना आहे. राज्य संकटात असताना जो माणूस दुसऱ्या राज्यात प्रचाराला जातो असा माणूस राज्याचा कारभार करायाला नालायक आहे आणि सरकारमध्ये रहायचा त्यांना अधिकार नाही, अशी जळजळीत टीका त्यांनी केली.