दिवाळीचा सण एकीकडे उत्साहात साजरा होत असताना आंबा प्रेमीसाठी महत्वाची बातमी आली आहे. फळांचा राजा हापूस आंबा याची या वर्षांची पहिली पेटी मालवण येथून नाशिकसाठी रवाना झाली आहे. या मोसमातील हापूस आंब्याची पहिली पेटी असल्याने तिला भाव देखील तेवढा मोठा मिळालेला आहे. दरवर्षी हापूस आंबे सर्वसामान्यांना उन्हाळ्यात खायला मिळत असतात.परंतू त्यांची योग्य देखभाल आणि काळजी करुन हे फळ लवकर पिकविण्याचा मान सलग चौथ्यांदा मालवण कुंभारमाठ येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार डॉ.उत्तम फोंडेकर यांना मिळाला आहे.
जिल्ह्यातील अनियमित पाऊस आणि बदलते हवामान यापासून संरक्षण करुन बुरशी आणि इतर किडीवर मात करीत फोंडेतर बंधूना हे मोसमातील पहिले फळ पिकविण्यात यंदाही यश आले आहे. फोंडेकर यांनी सलग चौथ्यांदा राज्यातील सर्वप्रथम आंबा पेटी बाजारात पाठविण्याचा विक्रम केला आहे.त्यांच्या कार्याबद्दल त्यांना डॉक्टरेट प्रदान केली असून मालवण तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश मिळविले आहे. उत्तम फोंडेकर आणि सुर्यकांत फोंडेकर बंधूंचे कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी अभिनंदन केलेले आहे.
आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांनी यंदाच्या हंगामातील पहिलीच देवगड हापूस आंब्याची पेटी नाशिकला थेट ग्राहकापर्यंत पोहचवली आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर त्यांनी चार डझन आंब्यांची पेटी थेट ग्राहकाला विकलेली आहे. या पेटीला 25 हजाराचा विक्रमी भाव मिळाला आहे. फोंडेकर बंधूंनी चौथ्यांदा पहीली आंबा पेटी विक्री करण्याचा मान मिळविला आहे. आंब्याचा हंगाम सुरू होण्यासाठी अजूनही तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे. या वर्षाच्या हंगामातील पहिली पेटी फोंडेकर यांच्या बागेतून नाशिकला पाठविण्यात आली आहे.