मुंबई : मुलुंड ते गोरेगाव लिंक रोड ( GMLR PROJECT ) या महत्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी बोरीवली नॅशनल पार्कच्या पोटातून जाणाऱ्या 4.7 किमीच्या दुहेरी टनेल बोगदा खणण्यात येणार आहे. मुंबई महानगर पालिकेच्या ( MCGM ) तब्बल 8 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी अखेर तीन कंपन्यांच्या निविदा आल्या आहेत. यात अॅफ्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, लार्सन एण्ड टुब्रो आणि एनसीसी-जे.कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट या तीन कंपन्यांनी निविदा सादर केली आहे.
संजय गांधी उद्यानाच्या खालून दुहेरी बोगदा खणण्यात येणार असून त्यातून पश्चिम ते पूर्व कनेक्टीविटी होणार आहे. बोरीवली नॅशनल पार्कच्या गोरेगाव चित्रनगरी ते मुलुंड खिंडीपाडा असा दुहेरी बोगद्याचे काम होणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाला पूर्व द्रुतगती महामार्गाशी जोडले जाणार आहे. या बोगद्याचे काम तीन टप्प्यात होणार आहे. मुंबई पालिकेने या कामासाठी यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये अंदाजित 6,322 कोटीचे टेंडर काढले होते. आता फेरआढाव्यानंतर 8000 कोटी अंदाजित बजेट ठरविण्यात आले असून पुन्हा निविदा काढली आहे.
डीझाईन आणि कन्स्ट्रक्शन अशा स्वरुपाचे कामासाठी आता महिनाभरात निविदांचे निवड निश्चित केली जाईल असे पालिका अधिकाऱ्यांनी टाईम्सला सांगितले. मार्च 2023 पासून हे काम सुरु होणार होते, परंतू फेर निविदा काढल्याने आता वेळ लागणार आहे. निविदा निश्चिती नंतर चार वर्षे या प्रकल्पाच्या कामासाठी लागणार आहेत.
नाहूर जवळील 711 बांधकामे त्यात 51 खाजगी बांधकामे पाडावी लागणार आहेत. तसेत 100 प्रकल्पबाधितांचे पुर्वसन संजय गांधी उद्यानात करावे लागणार आहे. त्यासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन आणि पर्यावरण कायद्यात बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे मेट्रो तीनच्या कारशेड नंतर आता या बोगद्याच्या कामामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. या दुहेरी बोगद्यासाठी भूयारी मेट्रो तीन आणि कोस्टल रोडच्या धर्तीवरील टनेल बोअरिंग मशिन टीबीएम मशिनने 4.7 किमीच्या बोगद्यांचे खोदकाम होणार आहे.