काही महिन्यांवर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. अशात सर्वत्र चर्चा आहे ती आगामी निवडणुकीची… कोणत्या पक्षाच्या किती जागा येणार? सर्व पक्ष आघाड्यांमध्ये लढणार की स्वतंत्र, स्वबळावर? कुणाचं सरकार सत्तेत येणार? कोण राज्याचा मुख्यमंत्री होणार? असे असंख्य प्रश्न सध्या चर्चेत आहेत. अशात टाईम्सचा सर्व्हे समोर आला आहे. यात चकित करणारी आकडेवारी समोर आली आहे. यात महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांनी स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचं म्हटलं आहे. शिवाय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कुणाला मुख्यमंत्रिपदासाठी पसंती मिळतेय? याचीही आकडेवारी समोर आली आहे.
टाईम्स मॅट्रिझकडून सर्व्हे करण्यात आला आहे. यानुसार कोणत्याच पक्षाला शिवाय महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. टाईम्सच्या सर्व्हेनुसार भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. 95 ते 105 जागा भाजपला मिळू शकतात. शिवसेना शिंदे गटाला 19 ते 24 जागा येण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ 7 ते 12 जागांवर विजय मिळवता येऊ शकतो. शिवसेना ठाकरे गटाचे 26 ते 31 उमेदवार निवडून येऊ शकतात. काँग्रेस 42 ते 47 जागांवर जिंकू शकते. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 23 ते 28 जागावर विजय मिळवता येऊ शकतो, असा अंदाज टाईम्सच्या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार? याची राज्यात चर्चा सुरुच आहे. पण निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार? याचीही चर्चा होत आहे. याबाबतही टाईम्सने सर्व्हे केला आहे. यात एकनाथ शिंदे यांना 27 % लोकांनी पसंती दिली आहे. तर 23 % लोकांनी उद्धव ठाकरेंना आपली पसंती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं 21 % लोकांना वाटतं आहे. दरम्यान हा केवळ सर्व्हे आहे. अद्याप विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर निकाल लागेल आणि मग राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होऊ शकतो.