मुंबई : आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असं म्हटलं जाते. पण उद्या मुंबईकरांची सावली अदृश्य होणार आहे, असं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. मुंबईकरांना गुरुवार दि. 16 मे रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी, तर ठाणेकरांना 17 मे रोजी 12 वाजून 35 मिनिटांनी आपली सावली अदृश्य झाल्याचा अनुभव घेता येणार आहे.
“उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातच सूर्य आकाशात बरोबर डोक्यावर आल्याने माणसाची सावली अदृश्य होते. शून्य सावलीचा अनुभव आपल्या वर्षातून दोनवेळा घेता येतो”, असं सोमण म्हणाले.
आपण जिथे असतो त्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती ज्या दिवशी सारखी होते त्याच दिवशी दुपारी मध्यान्हाला सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येतो. मुंबईचे अक्षांश उत्तर 19 अंश आहे. गुरुवार दि. 16 मे रोजी सूर्याची क्रांती उत्तर 19 अंश होणार असल्याने दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येईल आणि मुंबईकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येईल.
“रविवारी 28 जुलै रोजी पुन्हा सूर्याची क्रांती उत्तर 19 अंश होणार आहे. परंतु तो दिवस पावसाळ्याचा असल्याने शून्य सावलीचा अनुभव आपणास घेता येणार नाही. ठाणे, बोरिवली, डोंबिवली, कल्याणकरांना शुक्रवार 17 मे रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी शून्य सावली अनुभवता येईल”, असेही खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी म्हणाले.