मुंबई : आपण मुंबई लोकलमध्ये एवढ्या दिवसांपासून प्रवास करत असतो, पण काही सुविधा आपल्याला माहित नसतात. खास करुन प्रवास खर्चा बद्दल किंवा एकाच दिवशी पुन्हा पुन्हा तिकिट काढण्याच्या कटकटीविषयी. तर मुंबईमध्ये पर्यटनासाठी किंवा आपल्या कामासाठी जर तुम्हाला मोजक्या दिवसांसाठी फिरायचे असेल तर उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर खास ‘पर्यटन तिकीट’ ( Tourist Tickets ) विकत मिळते. या तिकीटांद्वारे लोकल ट्रेनच्या सेंकडक्लासमधून मुंबईत मध्य रेल्वेवर ( Central Railway ) सीएसएमटी ते कर्जत-कसारा-पनवेल आणि पश्चिम रेल्वेवर ( Western Railway ) चर्चगेट ते डहाणूपर्यंत कितीही वेळा प्रवास करण्याची सोय आहे. या पर्यटन तिकीट सेवेबद्दल जाणून घेऊया…
मुंबईत नवख्या आलेल्या व्यक्तींकडे जर रेल्वेचा पास नसेल तर त्यांच्यासाठी एक रेल्वेची सुविधा आहे. अशा व्यक्तींना जर मुंबई फिरायची असेल किंवा काही कामानिमित्त विविध ठीकाणांना भेट द्यायची असेल किंवा प्रवास करायचा असेल तर उपनगरीय रेल्वेची ‘पर्यटन तिकीट’ ही सुविधा अत्यंत उपयोगाची आहे. त्यामुळे वारंवार तिकीट काढण्याची काही गरज उरत नाही. शिवाय रेल्वेचा पास नसलेल्या व्यक्तींसाठी रेल्वे मोजक्या दिवसांच्या मुंबई आणि उपनगरातील प्रवासासाठी हे ‘पर्यटन तिकीट’ अत्यंत उपयुक्त आहे.
या तिकीटांची किंमत आणि वैधता…
मुंबईत पर्यटन करणाऱ्यांसाठी पर्यटन तिकीट विकत मिळते. एक दिवसाचे तिकीट 80 रूपयांना तिकीट खिडक्यांवर विकत मिळते. परंतू या तिकीटांतून रात्री 12 वाजेपर्यंतच प्रवास करता येतो. तसेच केवळ रेल्वेच्या द्वितीय दर्जातूनच प्रवा करता येतो. तसेच हे पर्यटन तिकीट एक दिवसाचे ( 80 रूपये ), तीन दिवसाचे ( साधारण 170 रूपये ) आणि पाच दिवसांचे ( 210 रूपये ) अशा किंमतीत ही पर्यटन तिकीटे मिळतात अशी माहीती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली आहे. या तिकीटांना आपल्याला ज्या तारखे पासून प्रवास करायचा असेल त्या तारखेपासूनही आगाऊ ही तिकीटे काढण्याची देखील सोय उपलब्ध असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.