मुंबई : इर्शाळवाडीत दुसऱ्या दिवशीही मदतकार्य सुरुच होता. आतापर्यंत 22 जणांचे मृतदेह सापडले असून119 जणांना वाचवण्यात यश आलंय. तर दुसरीकडे अमित ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. सरकार, आमदार फोडण्यात व्यस्त होतं, असं अमित ठाकरे म्हणालेत. तर राज ठाकरेंनी 11जूनलाच दरडीसंदर्भात संभाव्य धोका व्यक्त केला होता. ती क्लीपही आता व्हायरल होतेय.
इर्शाळवाडीवर दरड दुर्घटनेत मृतांचा आकडा 22 वर पोहोचलाय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इथल्या स्थानिकांना मोठा दिलासा देणारी घोषणा केलीय. इर्शाळवाडीतील नागरिकांसाठी सिडकोद्वारे कायमस्वरुपी घरं बांधून दिली जाणार आहेत. या दुर्घटनेवरुन अमित ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर दुर्घटना टाळता आली असती, असं अमित ठाकरे म्हणाले. तर अमित ठाकरेंची सध्या ट्रेनिंग सुरु असून त्यांना संधी दिली पाहिजे, असा टोला नितेश राणेंनी लगावला. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 11 जूनचं एक वक्तव्य व्हायरल होतेय. 11 जूनच्या भाषणात राज ठाकरेंनी दरडी कोसळू शकतात, असा इशारा प्रशासनाला दिला होता.
इर्शाळवाडीतल्या दरड दुर्घटनेत अनेकांचे जीव गेले. पण जे जीव वाचवून सुरक्षित स्थळी पोहोचले होते…ते परत आपल्या घरांच्या शोधात आलेत. बुधवारी रात्री 11 वाजता, दरड कशी काळ बनून कोसळली, याचे हे प्रत्यक्षदर्शीही आहेत. हे आहेत बुधाजी पारधी. मृत्यूच्या दरडीतून बुधाजी पारधी आणि त्यांच्या घरातले तर सर्व जण वाचले. पण त्यांच्या मेहुणे आणि भाच्याकडचे 8 जण बेपत्ता आहेत.
इर्शाळवाडीतल्या शाळेत आश्रयाला आलेले हे आजोबा आहेत, रामा पारधी दरड कोसळली त्यावेळी त्यांच्या घरी 8 जण होते. त्याचं घर पूर्णपणे उद्ववस्त झालं. दरडीमुळं त्या ढिगाऱ्याखाली कुटुंबातले 4 जण आले होते.पण त्यांना तात्काळ कुटुंबीयांनीच ढिगाऱ्याखालून काढलं. त्यामुळं कुटुंबातले सर्व सुखरुप आहेत. इर्शाळवाडीत अशा अनेक घटना कानावर पडतायत.
कोणाचं कुटुंबच्या कुटुंब ढिगाऱ्याखाली गेलं..तर नातेवाईक, आपल्यांच्या शोधात आहेत. मंगळा लचका यांच्या दीराच्या कुटुंबीयातील 7 जण अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत. इर्शाळवाडीत जाण्यासाठी फक्त पायी, हाच एक मार्ग आहे…त्यामुळं ज्यांची वाहनं होती, ते गावापासून दीड तासांवर असलेल्या नंबराची वाडी इथं गाड्या लावायचे.
या 3 गाड्या भगवान तिरकड, दिनेश तिरकड आणि कृष्णा तिरकड या 3 भावंडांच्या आहेत. तिन्ही भाऊ होमगार्ड असल्यानं, इर्वाळवाडीतून ते नंबराची वाडी इथं याचचे आणि इथूनच गाड्या घेऊन ड्युटीवर जायचे. पण इर्शाळवाडीतल्या दरड दुर्घटनेच्या संकटात हे तिघेही भाऊ अडकले आणि अजून त्यांचा शोध सुरु आहे. या ढिगाऱ्याखाली एक एक जीव शोधण्यासाठी NDRF आणि इतर कामगारांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या शोधकार्यातही पाऊस अडथळा ठरतोय.