मुंबई : भ्रष्टाचारे आरोप करुन विरोधकांच्या फाईल्स बाहेर काढणारे सोमय्याच आता व्हिडीओ क्लीपमध्ये अडकलेत. सोमय्यांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, विधान परिषदेत ठाकरे गट अक्षरश: तुटून पडला. तर सोमय्यांनी फडणवीसांना पत्र लिहून चौकशीची मागणी केलीय. त्यानुसार फडणवीसांनीही चौकशीचे आदेश दिलेत.
प्रतिकात्मक हातोडा घेऊन विरोधकांना हिशेब मागणारे किरीट सोमय्याच सध्या एका, व्हायरल अश्लिल व्हिडीओच्या कचाट्यात अडकलेत. व्हायरल अश्लील क्लीप एका फाईव्ह स्टार हॉटेलमधील असल्याचं बोललं जातंय. तासांच्या 35 क्लीप्स असलेला पेनड्राईव्ह पीडितेनंच आपल्याला दिल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलाय. झेड सुरक्षेचा धाक दाखवून सोमय्यांनी महिलांचं शोषण केल्याचा गंभीर आरोपही दानवेंचा आहे.
दानवेंनंतर, अनिल परब सोमय्यांवर तुटून पडलेत. आमच्या मागे ईडी, सीबीआय लावली आता व्हायरल व्हिडीओची RAWद्वारे चौकशी करणार का ? असा खोचक टोला परबांनी लगावला. मविआ सरकारच्या काळात सोमय्यांनी, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर धुवांधार आरोप केले होते. डर्टी डझन म्हणत ट्विट करुन जेलमध्ये पुढचा नंबर कोणाचा ?, हे जाहीरपणे सांगत होते पण सोमय्यांची आता डर्टी क्लीप व्हायरल झालीय..सोमय्या ज्या 12 नेत्यांना डर्टी डझन म्हणत होते, त्यात अनिल परबांचाही समावेश होता.
मी अनेक महिलांवर अत्याचार केल्याच्या तक्रारी आल्यात आणि अनेक व्हिडीओ क्लीप आहेत असे दावे केले जात आहेत. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही. आपणास विनंती आहे की, व्हिडीओ क्लीप्सची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी. तर पत्रात, सोमय्यांनी क्लीप बनावट आहेत, असा उल्लेख केलेला नाही. त्यामुळं एकप्रकारे सोमय्यांनी कबुलीच दिलीय, असं परबांचं म्हणणंय. तर व्हायरल क्लीपची चौकशी करणार, कोणाला पाठीशी घालणार नाही, असं गृहमंत्री फडणवीस म्हणालेत.
ऐन अधिवेशन सुरु असतानाच, सोमय्यांच्या व्हायरल क्लीपचा बॉम्ब पडलाय..विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सोमय्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं निषेध आंदोलन करत सोमय्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. नागपुरात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सोमय्यांच्या बॅनरला, चपलांनी मारत निषेध केला पंढरपूरमध्ये ठाकरे गटाच्या युवासेनेच्या वतीनं सोमय्यांच्या फोटोला जोडे मारत निषेध करण्यात आला. अमरावतीतही ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
किरीट सोमय्यांनी ज्या पद्धतीनं, ठाकरे गटाला टार्गेट केलंय. त्यामुळं ठाकरे गट आक्रमक आहेच. कारण सोमय्या थेट मातोश्रीवर हल्लाबोल करत ठाकरेंना घेरायचे. त्यामुळं सोमय्यांसोबत ठाकरे गटाची राजकीय दुश्मनी जुनीच आहे. आता ठाकरे गट आक्रमक झाल्यानंतर, भाजपच्या नितेश राणेंनी इशाराच दिलाय.सोमय्यांच्या व्हिडीओमागे अनिल परब मास्टरमाईंड असल्याचा आरोप रवी राणांनी केलाय. आतापर्यंत सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत, विरोधकांच्या फाईल्स काढल्या…मात्र आता सोमय्यांचे क्लीप्स समोर आल्यात. ज्याची सोमय्यांच्या भाषेत चौकशी सुरु होणार आहे.