छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा आरक्षणावरून पुन्हा टीकेची तोफ डागली. टीव्ही9 मराठी कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या बदलत्या भूमिकेचा समाचार घेतला. मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेट दिला आहे. मराठा आरक्षणात कळीचा मुद्दा असलेल्या सगेसोयऱ्याविषयी त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. काय म्हणाले भुजबळ?
हा तर आरक्षणावर घाला
मी कुणाकडे काही मागत नाही. मी काय सांगितलं. पलिकडचे लोक काय म्हणतात. ओबीसीतून आरक्षण द्या. मी काय म्हणतो, आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. कारण ३८४ जाती आहेत. तुम्ही आला तर कुणालाच काही मिळणार नाही. पवारांशी या विषयावरच चर्चा झाली. मंडल आयोग आल्यावर आम्ही पवारांकडे आरक्षण लागू करण्याची मागणी केली होती. त्यांनी एक दीड महिन्यात अंमलबाजवणी केली. त्यांना तेच सांगायला गेलो होतो. आरक्षणावर घाला येत आहे. तुम्ही सीनियर नेते आहात. तुम्ही सांगा. यात मराठ्यांना घ्यायचं का हे विचारण्यासाठी मी पवारांकडे गेलो. पवार, ठाकरे असो किंवा काँग्रेसने सांगावं, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं का, हे स्पष्ट करा, असे भुजबळ म्हणाले.
मी शिवसेना आरक्षणाच्या मुद्द्यावर सोडली. आमचा बॅकलॉग भरला गेला नाही. मराठा समाजाला १० टक्के टिकणारं आरक्षण दिलं. त्या १० टक्क्यात फक्त मराठा आहे. दहा टक्क्यात फक्त मराठा समाज आहे. ओबीसीत साडे तीनशे जाती आहेत.
सगेसोयऱ्याबाबत काय म्हणाले भुजबळ
अध्यादेश काढलेला नाही. अधिसूचनाही काढली नाही. हे असे करावे का त्यावर लोकांच्या हरकती मागवल्या, साडे आठ लाख हरकती आल्या. असं करू नये म्हणून सांगितलं. मी रिबेरो, अणे साहेब, कुंभकोणी यांनाही विचारलं. काहींनी तोंडी सांगितलं. काहींनी लिहून दिलं. असं केलं तर कोणीही कोणत्या आरक्षणात जाईल. दलित समाज, मुस्लिम आणि ब्राह्मण येतील. मला वाटतं सगेसोयरे काही होणार नाही. झालं तरी कोर्टात एक मिनिटही टिकणार नाही, असे भुजबळ म्हणाले.
राजकारणात कोणीच शत्रू नाही
त्या दिवशी गेलो होतो ना पवारांच्या घरी. साहेब आजारी होते. दोन तास थांबलो. आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही. राजकारणात एकमेकांच्या विरोधात आहोत. राजकारणात कुणाला दुश्मन समजत नाही. राजकीय विरोधक समजतो. आरक्षणासाठी मी पवारांकडेही जाईल. मोदींकडेही जाईल, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या घरीही जाईल. यापुढे कोणी कुठे असेल पण कुणी चहाला बोलावलं तर मी जाईल तिकडे. मी अजितदादा आणि महायुतीची साथ सोडणार नाही. अजितदादांच्या आमच्याकडे मोठ्या सभा झाल्या, लाडकी बहिणीच्या झाल्या. राजकारणात शंका घेऊ नका. राजकारणात शंका घेणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
जाहीरसभेत कार्यकर्त्यांनामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी शायरी करतो. याचा अर्थ तलवार काढतो असं नाही. आता भेट दिलेली तलवार वर केली तरी पोलीस गुन्हा दाखल करतात. बाळासाहेब म्हणायचे गवताच्या पात्याला तलवारीची धार चढली पाहिजे. म्हणजे काय. कार्यकर्त्यांना उत्साह देण्यासाठी बोलावं लागतं. काही लोक उपोषणावेळीही पिस्तुल चालवतात, अशी टीका त्यांनी केली.