आपले मंत्री आणि आमदारांसह अजित पवार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आले आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली. ऐरवी अजित पवारांना अशा प्रकारे क्वचितच मंदिरात बघितलं असेल. पण आता आपल्या सहकाऱ्यांसह दादांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी अजित पवारांनी अभिषेकही केला.
गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर, अजित पवारांनी विजयाची व्हिक्ट्री साईनही दाखवली. आणि त्यानंतर आपण विधानसभेच्या निवडणुकीसाठी सिद्धिविनायकाकडे आशीर्वाद मागितल्याचंही सांगितलं. पाप करणाऱ्यांना सिद्धिविनायकाचे आशीर्वाद मिळत नाहीत, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली. तर, रोहित पवारांनीही डिवचण्याची संधी सोडली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं राजकीय रणनीतीकार नरेश अरोरांना काम दिलंय. सिद्धिविनायकाचं दर्शन हाही अरोरांना दिलेल्या 200 कोटींचं कॅम्पेनचा भाग आहे, असं रोहित पवार म्हणालेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही, अजित पवारांच्या इव्हेंटचा हा भाग असल्याचं म्हटलंय. राजकीय रणनीतीकार म्हणून याआधी प्रशांत किशोर यांची ओळख आहे. प्रशांत किशोर यांच्या सारखेच नरेश अरोरा हेही निवडणूक कॅम्पेनर आहेत. नरेश अरोरा पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनी design boxed.com चे सहसंस्थापक आहेत. राजस्थान आणि कर्नाटकसह इतर राज्यात काँग्रेससाठी त्यांनी निवडणूक प्रचाराचं काम केलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत नरेश अरोरा उपस्थित होते. दादांच्या आमदारांना अरोरांनी पक्षाचं ब्रँडिंग आणि रणनितीवर सविस्तर माहितीही दिली. लाडकी बहीण, 3 सिलेंडर मोफत, शेती पंपाला वीज बिल माफीसह योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 90 दिवसांचा रोडमॅप तयार करण्यात आलाय.
लोकसभा निवडणुकीत 4 पैकी एकच जागा अजित पवारांना जिंकता आली. बारामतीत सुनेत्रा पवारांचाही पराभव झाला..त्यामुळं विधानसभेसाठी अजित पवारांनी रणनीतीकाराला सोबत घेतलंय. नेत्याची इमेज बिल्डिंग करण्याचं काम निवडणूक कॅम्पेनर कडून केलं जातं. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेल्याचं विरोधकांचं म्हणणंय.