अजित पवारांनी आधी काका शरद पवारांच्याच विरोधात बंड केलं आणि 40 आमदारांसोबत महायुतीत सहभागी झाले. पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादी पक्षही अजित पवारांना मिळाला. त्यातच लोकसभा निवडणुकीत बारामतीतून, बहीण सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांनाच उभं केलं. अजित पवारांच्या या भूमिकेमुळं पवार कुटुंबातही एकटे पडले. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनीही दादांना साथ न देता शरद पवारांच्या बाजूनं उभे राहिलेत.
गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्ली इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा झाली. दादांचे मंत्री धर्मराव बाबाआत्राम यांची मुलगीच, भाग्यश्री आत्राम हलगेकर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आहे. त्यावरुन आपण चूक केली तसंच करुन नका, असा सल्ला दिला. त्याचवेळी काही जण घर फोडण्याचं काम करत असल्याचं आरोप करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
पाहा व्हिडीओ:-
मंत्री धर्मरावबाबा आत्रामांनीही, माझ्याच विरोधात मुलीला उभं करण्याचा डाव शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा असून जी मुलगी माझी झाली नाही ती तुमची काय होणार अशी टीका आत्रामांनी केली. तसंच मुलीसह सर्व हलगेकर कुटुंबच नदीत टाकणार, असा इशाराच आत्रामांनी दिला. धर्मराव बाबा आत्राम,शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले. मात्र त्यांचीच मुलगी भाग्यश्री आत्रामही वडिलांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आहे. अहेरी विधानसभेतून, वडील विरुद्ध मुलगी असाच सामना होण्याची दाट शक्यता आहे.