Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बदलापूर घटनेनंतरच इतर घटना कशा काय समोर- राज ठाकरे

| Updated on: Aug 24, 2024 | 11:05 PM

बदलापूरच्या घटनेनंतर इतर लैंगिक शोषणाच्या बातम्या रोजच्या रोज कशा काय येत आहेत. यामागे राजकारण करुन सरकारची बदनामी करायची आहे का? अशी शंका राज ठाकरेंनी व्यक्त केलीय. वाचा टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बदलापूर घटनेनंतरच इतर घटना कशा काय समोर- राज ठाकरे
Follow us on

बदलापूर घटनेनंतरच इतर अनेक ठिकाणच्या घटना कशा काय समोर येत आहेत? निवडणूक काळात हा महायुती सरकारच्या बदनामीचा डाव आहे का? असा अजब प्रश्न राज ठाकरेंनी केलाय. या विधानावरुन राज ठाकरेंच्या भूमिकेवर पुन्हा एकदा विरोधकांनी टीका केलीय.

अकोल्यात एका झेडपी शिक्षकानं ६ मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोप झाला. गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून चर्चा होत असलेल्या या प्रकरणाला बदलापूरच्या घटनेनंतर वाचा फुटली. कोल्हापुरात १० वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या केली गेली. 22 तारखेला मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. या आठवड्यात सिन्नर, नागपूर, मुंबई, चांदिवलीत अशा घटना समोर आल्या. बदलापुरात उद्रेकानंतर पोलिसांवरही इतर घटनांत गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव तयार झाला. मात्र या साऱ्या बातम्या समोर येणं, यामागे राज ठाकरेंना राजकारणाचा वास येतोय. मविआच्या काळातही अशाच घटना घडत होत्या, पण निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारच्या बदनामीचा डाव आहे का असा प्रश्न राज ठाकरेंनी केलाय.

वास्तविक अशा घटनानंतर प्रत्येक ठिकाणचे पोलीस, राजकीय कार्यकर्ते, लोक अलर्टवर असतात. वातावरण गरम आहे तोपर्यंत काही काळ तरी गुन्ह्यांची नोंद आवर्जून केली जाते., एखाद्या भीषण घटनेनंतर आरोपीशी किंवा गुन्ह्यांशी निगडीत अनेक पैलू समोर येतात. उदाहरणार्थ पुण्यातल्या पोर्शे कार अपघातानंतर स्वतः पोलिसांनीच आरोपी बिल्डरचा बाप, त्याचा आजोबा आणि त्यांचे दाऊदशी असलेल्या संबंधापासून अनेक केसेस पुन्हा ओपन केल्या. विशेष म्हणजे बदलापूरची घटना समोर आणण्यास खुद्द मनसे पदाधिकाऱ्यांचाही वाटा राहिलाय. पण त्यानंतरच्या घटनांवर राज ठाकरेच शंका उपस्थित करतायत.

छत्रपती संभाजीनगरनंतर नागपूरच्या पत्रकार परिषदेतही त्याचीच पुनरावृत्ती झाली. गेल्या काही काळात राज ठाकरेंनी महायुती सरकारमध्ये प्रामुख्यानं शिंदे-फडणवीस वगळता अजित पवारांचं नाव घेवून टीका केलीय. पुण्यातल्या पुरावेळी राज ठाकरेंनी अजित पवारांवरुन धरणाचं विधान केलं आणि लाडकी बहिणीवरुनही राज ठाकरेंच्या निशाण्यावर अजित पवारच होते. पोलिसांनाच गुन्हे न नोंदवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत का, असं म्हणून राज ठाकरे पोलिसांनाच हतबल केलं गेल्याचं सूचवत आहेत. दुसरीकडे त्यांच्याच मनसे पदाधिकाऱ्यांच्या मते वरिष्ठ पीआय शितोळेंनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्यानंतर एसीपींनी मात्र स्वतःहून गुन्हा दाखल करुन घेतला.

बदलापूरची घटना मनसैनिकांनी वाचा फोडल्यानंतर समोर आली. याचा अभिमान असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावेळी महायुती सरकारवर राज ठाकरेंनी टीकाही केली. मात्र बदलापूरनंतर ज्या इतर घटना समोर आल्या त्यामागे विरोधक महायुती सरकारच्या बदनामी तर करत नाहीत ना, अशी शंकाही राज ठाकरेच उपस्थित करतायत.