विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी 160पेक्षा अधिक जागांची मागणी,हायकमांडला केल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपनं 160-170 जागांचा पेक्षा कमी लढू नये, अशी विनंती भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याचं कळतंय. शिंदेंच्या शिवसेनेला 70 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 58 जागा द्याव्यात असं सूचवण्यात आल्याची माहिती आहे. याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळांनी 90 जागांची मागणी केली होती…नंतर त्यांनी जेवढ्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला तेवढ्याच आम्हाला द्या, समसमान जागांची मागणी केली. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून रामदास कदमांनीही 100 जागांवरुन भाजपला जेवढ्या जागा तेवढ्याच आम्हाला हव्यात असा दावा केला.
लोकसभा निवडणुकीत भाजपपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेचा विजयाचा स्ट्राईकरेट जास्त आहे. त्यामुळं मागणीही जास्त आहे. 100 पेक्षा कमी जागा घ्यायच्या नाहीत,यावर ठाम राहण्याची भूमिका शिंदेंच्या शिवसेनेनं घेतल्याचं समजतंय. 2019च्या विधानसभेच्या निकालानुसार भाजपचे 105 आमदार निवडून आले. फुटीनंतर शिंदेंसोबत शिवसेनेचे 40 आमदार आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं फुटीनंतर आपल्यासोबत 43 आमदार असल्याचा दावा केला.
त्यामुळं मित्रपक्ष किंवा सोबत आलेले अपक्ष सोडून फक्त पक्षांचंच संख्याबळ 188 इतकं होतं. विधानसभेच्या एकूण जागा आहेत 288. त्यामुळं 100 जागा शिल्लक राहतात. त्यातून 3 पक्षांचं वाटप होईल. ज्यात भाजपला 50 पेक्षा अधिक जागांचा वाटा हवा. राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी भाजपला 120-130 जागांवरच समाधान मानावं लागेल, असा चिमटा काढलाय. तर शरद पवारांनी विधानसभेच्या निवडणुकीत सव्वा दोनशे जागा महाविकास आघाडीला मिळतील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय.
भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांच्यानंतर आणखी एका माजी आमदारानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. सुधाकर भालेरावांनी शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेतली. त्याच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातून पवारांनी अजित दादांना इशारा दिला. निवडणुक देणारे मतदार आणि पक्षाशी घात करणाऱ्यांना धडा शिकवा असं शरद पवार म्हणालेत. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्यात. तर महायुती 17 जागांवरच आली. त्यामुळं महाविकास आघाडीला कॉन्फिडन्स हाय आहे.