अजित पवार बोकांडी बसले असून त्यांना महायुतीतून काढा अशी थेट मागणीच पुण्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींनी केलीय. अजित पवारांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला. विधानसभेची सत्ता नको पण, अजित दादांना काढा अशी टोकाची मागणीच सूदर्शन चौधरींनी केलीय.
सुदर्शन चौधरी भाजपचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालकही आहेत. शिरुर लोकसभेची आढावा बैठक पुण्यात पार पडली. त्या बैठकीत भाजपचे आमदार राहुल कुलही होते. राहुल कुल यांच्यासमोरच सूदर्शन चौधरींनी अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी केली. आता पुण्याच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे भडकल्यात. सूदर्शन चौधरींची अजित पवारांवर बोलण्याची लायकी नाही, अशी टीका रुपाली ठोंबरेंनी केली.
अजित पवारांवर सुदर्शन चौधरी तुटून पडल्यानंतर दादांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. सुदर्शन चौधरींच्या कार्यालयावर धडक देत घोषणाबाजीही केली आणि कार्यालयात ठिय्याही दिला. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं. दादांच्या कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर सूदर्शन चौधरींनी आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचं म्हटलं. तर ज्या बैठकीत सुदर्शन चौधरी बोलले तिथं भाजपचे राहुल कुलही असताना का बोलले नाहीत, असा सवाल मिटकरींनी केलाय.
पाहा व्हिडीओ:-
लोकसभेचे निकाल लागल्यापासूनच, भाजपसोबत अजित पवारांचे खटके उडू लागलेत. आधी संघानं आपल्या मुखपत्रातून अजित पवारांना घेण्याची गरजच काय होती, अशी टीका करतानाच भाजपचीच ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचं म्हटलं. पुण्यात भाजप आणि संघाच्या बैठकीतही दादांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य न केल्याचं सांगत पराभवाचं खापर अजित पवारांवरच फोडण्यात आलं. आता पुणे जिल्ह्याच्या भाजपच्या उपाध्यक्षांनीच अजित पवारांना महायुतीतून काढा असं म्हटलंय. काही दिवसांआधीच राजकीय विश्लेषक अनिल थत्तेंनी अजित पवारांवर बाहेर जाण्याची परिस्थिती तयार करण्यात येईल, असं वक्तव्य केलं होतं.
ज्या बातम्या समोर येत होत्या त्यावरुन भाजपला अजित पवार नकोसे झालेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. आता सूदर्शन चौधरींच्या रुपानं दादा नको असं उघडपणे बोलण्यास सुरुवात झालीय.