मालवणमध्ये राजकोट किल्ल्यात राजकीय राड्या दरम्यान नारायण राणेंची धमकी. निलेश राणेंनी पोलिसांशी केलेल्या अरेरावी वरुन, पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आंदोलन केलं. चार आणे, बारा आणे, अटक करा नारायण राणे अशा घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्या. मालवणच्या राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर, पाहणीसाठी बुधवारी राणे आणि आदित्य ठाकरे दोघेही एकाचवेळी दाखल झाले आणि अक्षरश: राडा झाला. राणे आणि ठाकरेंचे समर्थक भिडले. राणे पिता पुत्रांची भाषाही कॅमेऱ्यात कैद झाली.
नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर बाळासाहेब ठाकरेंचा पुतळाही, सरकारच्या पैशानं उभारल्याची टीका केली होती. त्यावरुन पुन्हा राऊत आणि नितेश राणेंमध्ये जुंपलीय. मालवण किल्ल्यावर राडा झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या 42 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत. तर महाराजांचा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार अजूनही फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. त्यावरुन सुषमा अंधारेंनी नितेश राणेंसोबतचे फोटो दाखवून सवाल केलेत. इकडे शर्मिला ठाकरेंनीही महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरुन संताप व्यक्त केलाय. 45 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहिले म्हणून सांगता, भ्रष्टाचारातून महाराजांना तरी सोडा, असे खडेबोल शर्मिला ठाकरेंनी सुनावलेत.
पाहा व्हिडीओ:-
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राज्य सरकारनं नाही तर नौदलानं उभारला होता, असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. नौदलानंही एक पत्रक काढून स्पष्टीकरण दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं झालेलं नुकसान दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ज्ञांसह एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या पुतळ्याची संकल्पना नौदलानं आखली होती. पुतळ्याच्या पुर्नस्थापनेसाठी वचनबद्ध आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या प्रकरणात समितीची स्थापना केली असून, पुतळा कोळण्याची नेमकी कारणं काय. तसंच भव्य पुतळा उभारण्यासंदर्भात नौदलाच्या अधिकाऱ्यांसह वेगळी समिती नेमण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेत.