तळकोकणात शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे माजी आमदार राजन तेली यांच्यात पुन्हा एकदा वाद उफाळलाय. सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासकामांवरुन राजन तेलींनी केसरकरांना धारेवर धरत, मतदारसंघावर दावा सांगितलाय. युती म्हणून केसरकरांना मदत केल्यास सावंतवाडीची जनता माफ करणार नसल्याचं म्हणत तेलींनी केसरकरांवर निशाणा साधलाय.
एकीकडे कोकणात महायुतीत वाद रंगलाय. तर दुसरीकडे पुण्यातही महायुतीमध्ये श्रेयवादावरुन लढाई सुरु आहे. अजितदादांचे आमदार चेतन तुपेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसंच मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकावरही भाजप कार्यकर्त्यांनी काळं फासलंय.
महायुतीमधला हा काही पहिला वाद नाहीये. मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये वादांची मालिका सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वी गुलाबराव पाटलांनी अर्थखात्याला नालायक म्हटलं होतं. त्यावरुन देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. एवढचं नव्हे शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांनी देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेससंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतरही महायुतीत वाद निर्माण झाला होता
एकीकडे महायुतीत वाद सुरुच आहेत. तर दुसरीकडे खासदार विशाल पाटलांच्या विधानामुळे मविआत देखील वादाची चिन्ह आहेत. तासगावातून मविआकडून रोहित पाटील उमेदवार असण्याची शक्यता आहे. मात्र, विशाल पाटलांनी माजी मंत्री अजित घोरपडेंसोबत राहणार असल्याचं विधान केलंय. महायुतीमध्ये मागील काही दिवसांपासून श्रेयवाद आणि जागावाटपावरुन वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे महायुतीत सुरु असलेल्या या वादामुळे आगामी विधानसभेत महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.