मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य संतापजनक आहे. आधीच मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं रोष आहे. त्यातच वाईटातून काही चांगलं घडायचं असेल म्हणून पुतळा पडला, असं केसरकर म्हणतायत. 4 डिसेंबरला नौदलच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. मात्र 8 महिने 22 दिवसांत 28 फूट उंचीचा पुतळा पडला. आता 100 फूटांचा पुतळा उभारुन पुन्हा मोदींना बोलावू असं केसरकरांचं म्हणणंय.
महाराजांचा पुतळा शिल्पकार जयदीप आपटेनं तयार केला होता. त्याच्यासह स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. शिल्पकार आपटेला फक्त 3-4 पुतळेच बनवण्याचा अनुभव होता. तरीही आपल्याला काम मिळालं हे त्यानं, सनातन प्रभातला दिलेल्या मुलाखतीतच म्हटलंय. उद्धघटनाआधीच, आपटेनं मुलाखतीतून जे काही सांगितलं ते धक्कादायकच आहे.
धाडस आणि वेडेपणा यामध्ये तलवारीच्या पात्याच्या धारेएवढी लहान रेघ असते. जराही इकडचे पाऊल तिकडे पडले की थेट कपाळमोक्षच. संधी मोठी आहे सगळं व्यस्थित पार पडलं तर सगळीकडेच नाव होईल, पण जराही चूक झाली तर सगळेच संपेल, असं वाटलं. पण म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे. संधी हातातून सोडायची नाही. या कामाच्या आधी 3-4 शिल्पच बनवण्याची संधी मिळाली होती, ती अगदी दीड दोन फुटांची होती. 28 फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा बनवण्यासाठी 3 वर्षे लागतात.पण हा पुतळा जून महिन्यात बनवायला सुरुवात केली डिसेंबरमध्ये पूर्ण झाला.
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं नौदलाला 20 ऑगस्टला म्हणजे 7 दिवसांआधी लिहिलेलं पत्रही समोर आलंय. ज्यात बांधकाम विभागानं सांगितलंय की,पुतळ्यानं गंज पकडलाय. जून महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शिल्पकार जयदीप आपटेंकडून डागडुजी करण्यात आली. परंतू सध्यस्थितीत पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी आपण नट बोल्टचा वापर केला होता. त्या नट बोल्टला आता पावसामुळं व समुद्र किनाऱ्यावरील खाऱ्या वाऱ्यामुळं गंज पकडला आहे. त्यामुळं आपल्या स्तरावरुन संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबत कळवण्यात यावे.
पाहा व्हिडीओ:-
एक बाब स्पष्ट झाली की, पुतळ्याचं नुकसान होतंय, हे सार्वजनिक बांधकाम विभागाला समजलं होतं. मग नौदलला फक्त पत्र लिहून जबाबदारी का झटकली? स्वत: लक्ष लावून पुतळ्याचं संरक्षण का केलं नाही ? तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुतळा कोसळण्यासाठी, जोरदार वारा कारणीभूत असल्याचं म्हटलंय. 45 किलोमीटर प्रतिवेगानं वारे वाहिल्यानं पुतळ्याचं नुकसान झाल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. महाविकास आघाडीनं आता बुधवारी मालवण बंदची हाकची मोर्चाची घोषणा केलीय. प्रशासनाच्या भ्रष्ट काराभारा विरोधात जनसंताप मोर्चा असेल, असं महाविकास आघाडीनं म्हटलंय.