टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : “राष्ट्रवादीनं, महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं संजय राऊतांना वाटतं का?”

| Updated on: May 08, 2023 | 11:29 PM

शरद पवारांवरच, निशाणा साधल्यानं राऊतांना भुजबळांनी महाविकास आघाडीवरुनच इशारा दिलाय. पाहा टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट.

टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : राष्ट्रवादीनं, महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं संजय राऊतांना वाटतं का?
Follow us on

मुंबई : शरद पवारांनी आत्मचरित्रातून, उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरुन परखड भाष्य केलं. त्यानंतर आता सामनातूनही पवारांवर पलटवार करण्यात आलाय. मात्र पवारांवरच, निशाणा साधल्यानं राऊतांना भुजबळांनी महाविकास आघाडीवरुनच इशारा दिलाय. पाहा टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट.

राष्ट्रवादीनं, महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं संजय राऊतांना वाटतं का ?, असा सवाल छगन भुजबळांनी केलाय. आता एवढा टोकाचा सवाल भुजबळांनी का केला?, तर त्याचं कारण सामनातून शरद पवारांवरच साधलेला निशाणा. काही दिवसांआधीच निवृत्ती जाहीर केल्यानंतर पवारांनी 2 दिवसांतच निवृत्ती मागे घेतली. मात्र पक्ष पुढे नेता येईल असा वारसदार निर्माण करण्यात पवारांना अपयश आलं, अशी टीका सामनातून करण्यात आलीय.

शरद पवार यांच्या नंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा, बुडखा, बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच असल्यानं पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात नक्कीच मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले

तसं पाहिलं तर संजय राऊत, शरद पवारांचेही खास आहेत. मग त्यांनी पवारांना अपयशी म्हणण्यापर्यंत टीका का केली. तर पवारांची आत्मचरित्राची सुधारीत आवृत्ती. या सुधारित आवृत्तीतून पवारांनी, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीवरुन परखड शब्दात सवाल केले होते.

उद्धव ठाकरे यांनी फक्त दोनवेळा मंत्रालयात जाणं हे आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं. रश्मी ठाकरेंशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीचं वर्तमान समजत होतं. मी वडिलकीच्या नात्याने त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. उद्धव ठाकरे यांची प्रकृती, त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा यामुळे त्यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागत होती.

राज्याच्या प्रमुखाला राज्यातल्या घडामोडींची बितंबातमी हवी. काय घडतंय यावर बारीक लक्ष हवं. उद्या काय होऊ शकेल याचा अंदाज घ्यायची क्षमता हवी आणि त्यानुसार आज काय पावलं उचलली पाहिजेत? हे ठरवायचं राजकीय चातुर्य हवं. या सगळ्याच बाबतीत आम्हाला कमतरता जाणवत होती. अनुभव नसल्याने हे सगळंघडत होतं तरीही हे टाळता आलं असतं.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यानं शिवसेनेतच वादळ माजेल, याचा मात्र आम्हाला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडलं, संघर्ष न करता उद्धवनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला. राजकारणातल्या अतर्क्यतेचा आणखी एक अनुभव गाठीशी जमा झाला. पवारांच्या या टीकेनंतर, उद्धव ठाकरेंनीही माझं काम महाराष्ट्राला माहिती आहे असं प्रत्युत्तर दिलं होतं.

2019 नंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 3 पक्षांच्या महाविकास आघाडीसाठी, शरद पवारांनी पुढाकार घेतला. त्यामुळं उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री झाले. पण आत्मचरित्रातून उद्धव ठाकरेंवर झालेलं परखड भाष्य, ठाकरे गटाला आवडलेलं दिसत नाही. त्यामुळंच सामनातल्या अग्रलेखातून परतफेड झाल्याची चर्चा आहे.

अग्रलेखातल्या भाषेमुळं राष्ट्रवादी दुखावली हेही भुजबळाच्या प्रतिक्रियेतून दिसतेच. विशेष म्हणजे याआधी अजित पवार आणि नाना पटोलेंनीही राऊतांना फटकारलंय. राष्ट्रवादी किंवा पवारांबरोबरच, सामनातून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवरही हल्लाबोल करण्यात आलाय. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांना राऊतांनी सामनातून बेवारस कुत्रे म्हटलंय.

आपल्याभोवती वावरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत. याचा अंदाज पवारांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे त्यांना थांबवणार नाही, असे पवारांनी सांगितले. म्हणजेच लोक जाणार होते किंवा तूर्त थांबले आहेत. भाजपच्या लॉजिंग बोर्डिंगमधले बुकिंग अद्यापी रद्द झालेले नाही, हे स्पष्ट आहे. जे जातील त्यांची राजकीय कारकीर्द लोकच संपवतील. मग तो कितीही मोठा सरदार असो. शिवसेना सोडून गेले त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे.

ठाकरे गट किंवा राऊतांची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका सध्याच्या स्थितीत कॅज्युअली आहे…मात्र राष्ट्रवादी त्यातही पवारांवर निशाणा साधणारी आहे. आणि हे राष्ट्रवादी मान्य नाही. त्यातूनच मविआच्या अस्तित्वावरुनच भुजबळांनीही इशारा दिलाय.