मुंबई : अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि त्यांच्यासोबतच्या काही ओबीसी नेत्यांचं भांडण जरांगेंच्या मागण्या आणि सरकारसोबत आहे. कारण त्यांच्याच दाव्यानुसार जरांगेंच्या मागण्यांना सरकार झुकतं माप देतंय. मात्र यात एका घटनेवरुन सत्तेत असलेल्या छगन भुजबळांनी थेट दोन समाजांचा उल्लेख करुन टाकला. यावर प्रकाश शेंडगे म्हणतायत की एका तरुणानं ते आवाहन केलं होतं. त्याचा उद्वेग म्हणून भुजबळ तसं म्हणाले. त्या भावना समजून घ्यायला हव्यात. मात्र शेंडगेंसहीत अनेक नेत्यांनीच याआधी थेट उल्लेख केल्याची विधानंही चर्चेत राहिलीयत.
जर समजा आपण सरकारला माय-बाप मानलं. ओबीसी-मराठ्यांसह सर्व घटक भावंडं मानली आणि जर दोन भावांमध्ये कुणाला किती वाढलं जातंय. यावरुन वाद रंगला असेल तर समाज धुरीण मंडळींनी दोघं भावांना आपापसात चिथावणी देण्यापेक्षा कुणाचं काय चुकतंय, हे सांगून मायबाप सरकारकडे न्यायाचा आग्रह धरला पाहिजे. कारण धुरीण मंडळी सत्तेत आहे आणि राजकीय पक्षाशी निगडीत सुद्धा आहेत.
आश्चर्य म्हणजे आरक्षण वा सवलती देण्याचा आणि काढण्याचा सर्वस्वी अधिकार सरकारकडे आहे. सरकार कुणावरही अन्याय होणार नाही म्हणून ग्वाही देतंय. मात्र विधानं ही सरकारला प्रश्न करण्याऐवजी समाजांना उद्देशून होणार नाहीत. याची खबरादारी घ्यायला हवी. सरतेशेवटी गावगाडा अर्थकारणाबरोबर सामाजिक बंधात बांधला गेलाय. गावात एका भावकीचं वऱ्हाड दुसऱ्या भावकीच्या घरात उतरतं. तिसऱ्या भावकीच्या जोरावर लग्नकार्य पार पडतं. मतभेद असले तरी रित म्हणून अडी-नडीला भाजीपासून बांधापर्यंत आणि वावरापासून वाळवणापर्यंत हीच लोक धावून जातात.
राजकारणात मात्र एकत्रित निवडणुका लढलेले निवडणुकीनंतर मविआचं सरकार बनवतात आणि विरोधात लढलेले एका रात्रीतून पहाटेला शपथविधीही करतात. राजकारणातल्या टीकेच्या फैरी सत्तेच्या बंधनात पुसल्या जातात. पण हक्कांच्या या लढाईत जर जातीचे ओरखडे उमटले तर ते मिटायला अनेक पिढ्या जातात.