आंदोलनाच्या निमित्तानं कर्नाटकात झालेल्या वादात काँग्रेस सरकारच्या कारभारावर भाजपनं निशाणा साधलाय. भाजप नेत्यांच्या आरोपांनुसार कर्नाटकात गणपतीला तुरुंगात टाकण्यात आलं. काँग्रेसवर तुष्टीकरणाचाही आरोप भाजपनं केला. महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांनीही कर्नाटकातल्या घटनेवरुन मविआ नेत्यांना सवाल केले आहेत. दावे-प्रतिदाव्यांआधी कर्नाटकात नेमकं घडलं काय ते आधी समजून घेऊयात.
दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातल्या मांड्या शहरात विसर्जनावेळी दोन गटात वाद झाला होता. त्या घटनेचा निषेध म्हणून बंगळुरात विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन पुकारण्याची घोषणा केली. परवानगी नसताना बंगळूरच्या टाऊन हॉल परिसरात लोक जमू लागल्यानं पोलीस बंदोबस्त वाढवला गेला. त्यानंतर काही कार्यकर्ते आंदोलनातच गणपतीची मूर्ती डोक्यावर धरुन घोषणा देत आंदोलनस्थळी पोहोचले पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंदोलकांनी मूर्तीला घेवून रस्त्यावरच ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आधी मूर्तीला आंदोलकांकडून घेत पोलीस व्हॅनमध्ये ठेवलं. नंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं.
थोड्यावेळानं तिथं दुसरी पोलीस कार आल्यानंतर व्हॅनमधली मूर्ती कारमध्ये ठेवण्यात आली. मात्र तोपर्यंत पोलीस व्हॅनमध्ये ठेवलेल्या गणेशमूर्तीचे फोटो पत्रकारांनी टिपले आणि ते फोटो व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस शासित राज्यात गणपतीलाही अटक झाल्याची टीका भाजपनं केली.
या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेला दावा मात्र साफ खोटा असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. कर्नाटकातली घटना ही एका आंदोलनाच्या निमित्तानं घडली पण शिंदेंनी कर्नाटकात काँग्रेस सरकारनं गणेशोत्सवास मनाई केली. गणपतीला अटक करण्याचं पाप केल्याचा दावा केला. शिंदे आणि फडणवीस यांनी घटनेवर केलेल्या ट्विटला शेअर करत पटोलेंनी दोघांच्या दाव्याला खोटं ठरवलंय. कर्नाटकातल्या घटनेनंतर सोशल मीडियात अनेकांनी कर्नाटकात गणेशोत्सवावर बंदी आणली गेली. किंवा विसर्जनावेळी गणपतीला अटक झाल्याचे दावे केले होते. मात्र घटनेच्या पडताळणीनंतर हा दावा पूर्णपणे खोटा निघालाय. तूर्तास मात्र कर्नाटकातल्या पोलिसांनी गणेशमूर्तीला पोलीस व्हॅनमध्ये ठेवल्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोंवरुन भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना काँग्रेसवर निशाणा साधत आहेत.