मुंबई : महायुतीत नवे ठाकरे येतील हे आता निश्चित झालंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी भेट घेतली. अमित शाह आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा झाली. याच भेटीत महायुतीत मनसेचा समावेश आणि जागा वाटपावरुन चर्चा झालीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसेला महायुतीत 2 जागा मिळू शकतात. दक्षिण मुंबई आणि नाशिक किंवा शिर्डींपैकी एक..अशा 2 जागांवर चर्चा झाल्याचं कळतंय. अमित शाहांनी राज ठाकरेंना, 1-2 दिवसांत फडणवीसांसोबत बैठक करुन जागा वाटप आणि महायुतीत येण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असं सांगितलंय
आता ज्या 2 जागा मनसेला मिळू शकतात त्याचं विश्लेषणही जरा समजून घेवूया. दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकरांना महायुतीत मनसेकडून उमेदवारी मिळू शकते सध्या दक्षिण मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत तिसऱ्यांदा खासदारकीसाठी मैदानात आहेत. दक्षिण मुंबईतल्या लालबाग परळ भागात बाळा नांदगावकरांचा चांगला प्रभाव आहे. दक्षिण मुंबईत भाजपच्या मतांची संख्याही मोठी असून शिवसेनेतल्या फुटीमुळं नांदगावकर विजयी होऊ शकतात अशी भाजपच्या गोटात चर्चा आहे.
दुसरी जागा आहे…नाशिक किंवा शिर्डी…नाशिकमध्ये मनसेचा चांगला प्रभाव आहे. नाशिक महापालिकेत मनसेची सत्ताही होती आणि महापौरही होता. 2009मध्ये नाशिकमध्ये वसंत मोरे, नितीन भोसले आणि उत्तमराव ढिकले हे 3 आमदार निवडून आले होते. सध्या नाशिकमधून शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे खासादार आहेत पण इथं भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही दावा केला. आता मनसे सोबत आल्यास नाशिकची जागा मनसेलाच मिळण्याची शक्यता आहे
दिल्लीत राज ठाकरेंच्या दौऱ्यात त्यांचे अमित ठाकरेच सोबत होते…ऐरव्ही कायम सोबत असणारे बाळा नांदगावकरही राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात नव्हते. सोमवारी रात्रीच राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले..रात्री त्यांचा मुक्काम ताज मानसिंग हॉटेलमध्ये होता. हॉटेलमध्ये येताच महायुती किंवा अमित शाहांच्या भेटीवरुन राज ठाकरे थेट बोलले नाही. आपल्याला फक्त या ऐवढंच सांगितल्याचं मिश्लिकपणे राज ठाकरे म्हणालेत.
राज ठाकरे सोबत महायुतीत चौथ्या पक्षाची एंट्री होईल..आणि राज ठाकरेंचा फायदा होईल असं दादांचे मंत्री भुजबळ म्हणतायत..तर राऊतांनी काही फरक पडणार नसल्याचं सांगून राज ठाकरेंना इग्नोर केलं. अमित शाहांसोबतच्या भेटीनंतर अमित ठाकरेंनी फेसबुकवरुन पोस्ट करुन ग्रेट भेट म्हटलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह साहेब यांची भेट घेतली. मलाही या ग्रेट-भेटीचा साक्षीदार होता आलं.
याआधी 2019 मध्ये राज ठाकरेंनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली होती. आता राज ठाकरे दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला आले. 2019च्या लोकसभेत राज ठाकरेंनी मोदी शाहांना विरोध करत भाजपच्या विरोधात प्रचारसभा घेतल्या होत्या. लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी EVMच्या विरोधात राज ठाकरेंनी भूमिका घेत दिल्लीत निवडणूक आयुक्तांसमोर म्हणणं मांडलं होतं. त्याचवेळी आयुक्तांच्या भेटीनंतर राज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला आले होते. राजकारणात आणि तेही महाराष्ट्राबद्दल कधी काय होईल सांगता येत नाही. युती आणि आघाडीचं समीकरण लोकसभेची निवडणूक झाल्यावरही सुरुच आहे.