मुंबई : भाजप इतर पक्षांना नेस्तनाबूत करणार का काय, अशी शंका त्यांचेच सहकारी पक्षातले नेते व्यक्त करतायत. वाद आहे संभाव्य कमी जागा देण्याचा, ज्यावरुन शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी भाजपच्या कार्यपद्धतीवरच घणाघाती टीका केलीय. कदमांच्या टिकेवर भाजपचे बडे नेते मात्र फारसे बोलत नाहीयत.
जागांचे संभाव्य विविध फॉर्म्युले काय, त्यावरुन रामदास कदमांनी थेट भाजपवर इतकी आगपाखड का केली. त्यामागची कारणं समजून घेऊयात. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. महायुतीत वाटपाचे 3 फॉर्म्युले चर्चेत आहेत. पहिला 37 भाजप, 8 शिंदेंची शिवसेना आणि 3 अजित पवारांच्या राष्ट्रवादीलादुसरा 35 भाजप, 9 शिंदेंची शिवसेना, 3 राष्ट्रवादीला तिसरा भाजप 33, शिंदेंची शिवसेना 11 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंचे नेते किमान 15 तर अजित पवार किमान ११ जागांचा आग्रह धरतायत.
जर समजा भाजपनं शिंदे आणि अजित पवारांना अपेक्षेहून कमी जागा दिल्यास त्यामागे नॅरेटिव्ह काय सेट होऊ शकतं. ते समजून घेऊयात. 2019 ला शिवसेनेचे 18 खासदार जिंकले., सध्या त्यापैकी शिंदेंकडे 13 तर ठाकरेंकडे 5 खासदार आहेत, इकडे राष्ट्रवादीचे 4 खासदार जिंकले होते., त्यापैकी 3 शरद पवारांकडे तर 1 अजित पवारांकडे आहेत.
2019 मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख असताना शिवसेनेनं 23 तर भाजपनं 25 जागा लढवल्या होत्या. यंदा ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त 5 खासदार असूनही 3 पक्षांच्या मविआ आघाडीत त्यांना किमान 18जागा मिळू शकतात. तर शिंदेंकडे 13 खासदार असूनही 3 पक्षांच्याच महायुतीत त्यांना 18 जागा मिळण्याची शक्यता कमी आहे
तिकडे आघाडीत 2019 ला शरद पवार राष्ट्रवादीचे प्रमुख असताना त्यांनी 20 जागा लढवल्या होत्या. यंदा मविआत शरद पवारांच्या पक्षाला 8 ते 10 तर राष्ट्रवादी पक्ष मिळूनही अजित पवारांना 7 हून जास्त जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बंडानंतर आम्हीच खरी शिवसेना आणि आम्हीच खरी राष्ट्रवादी आहोत, असं शिंदे आणि अजित पवारांचे नेते सांगत. असले तर मग जागा कमी का मिळाल्या, यावरुन विरोधक शिंदे-अजितदादांसह भाजपला घेरु शकतात.
रामदास कदम, बच्चू कडूंसह भाजप मित्रपक्षांचे नेते यावरुन भाजपवर जाहीरपणे टीका करतायत. तर बातम्यांमध्ये तथ्य नसून सन्मानजनक जागा मिळतील., असं फडणवीसांनी म्हटलंय. यात वाद फक्त शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजपपुरता मर्यादित नाहीय. शिंदे इतक्याच जागा आम्हालाही हव्यात, या भुजबळांच्या दाव्यावरही रामदास कदमांनी टीका केलीय. खोके-ओक्केच्या टीकेवरुनही नाव न घेता शिंदेंच्या नेत्यांनी अनेकदा अजित पवारांना टोले मारले आहेत.मात्र यात गेल्या निवडणुकीत रामदास कदमांसोबत नेमका कुणी-कुणी दगाफटका केला., याचीही चर्चा आहे. शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंनी दापोलीत विरोधात काम केल्याचं म्हणणारे रामदास कदम आता तोच आरोप भाजपवरही करतायत.
विधानसभेत आपल्या मुलाविरोधात भाजपनं काम केल्याचा आरोप कदमांनी केला. योगायोग हा की या आरोपाच्या फक्त 14 तासानंतरच सरकारनं प्रदूषण महामंडळावरच्या आबासाहेब जऱ्हाडांना हटवून कदमांचे पुत्र सिद्धेश कदमांना अध्यक्ष नेमलंय. तूर्तास तिकीट जाहीर झाल्यावर सगळं काही बोलणार असा इशारा रामदास कदमांनी भाजपला दिलाय. त्यामुळे अंतिम फॉर्म्युला शिंदेंच्या शिवसेनेचं समाधान करेल की मग पुन्हा एकदा ठिणग्या उडतील, हे येत्या दोन ते तीन दिवसात स्पष्ट होणाराय.